पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहळ्यापूर्वी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. काल माजी आमदार मेधा पाटकर यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट करुन आपली नाराजी जाहीर केली होती. पण, आज लोकार्पण सोहळ्यात नाराजी नाट्यानंतर मेधा कुलकर्णी व्यासपीठावर दाखल झाल्या. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या होत्या. मात्र आता त्या कार्यक्रमासाठी आल्या. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पुण्यातील रस्त्यांसाठी मेधा कुलकर्णी यांची वारंवार मागणी होती. अडचणींवर मात करून चांदणी चौकातील रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आले. आधी हजारो कोटी खर्च करून सुद्धा वाहतुकीची समस्या सोडवली गेली नाही असे सांगत गडकरींनी कुलकर्णींच्या नाराजीवर फुंकर घातली.
ट्विटर अकाउंटवरून पोस्ट
काल भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी थेट आपली नाराजीची पोस्ट ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांना पुण्यातील कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांना अनेक संधींसाठी भाजपकडून डावलण्यात आले. पण, त्यांनी पहिल्यांदा अशी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचा प्रयत्न
माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे…. माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही. पण आता दुःख मावत नाही मनात. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण, मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी?
स्वतः गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते. माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा प्रश्न विचारला आहे.
मध्यंतरी मोदी, अमित शाह पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घेऊन निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे, असेही मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ex-MLA Medha Kulkarni on platform at Chandni Chowk Lokaparna ceremony in Pune