पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरेगाव पार्कमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजप आणि शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर अन्य ८ नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. हा वाद निवडणूक आयोगातही गेला आहे. या घडामोडींनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांची यापूर्वी तिनदा भेट घेतली आहे. त्यात काय चर्चा झाली हे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात शरद पवार हे व्यासपीठावर होते. त्यावेळी मात्र अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना टाळले. त्यांना नमस्कारही केला नाही. अजित पवार हे पाठीमागून निघून गेले. या घटनेची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार यांनी स्पष्ट केले की, शरद पवार यांच्याविषयी आदर असल्यानेच मी पाठीमागून गेलो.
पुण्यात आज चांदणी चौक उड्डाणपुलाचे उदघाटन झाले. या समारंभास अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्कमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट अतिशय गुप्तपणे झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
Pune Politics Ajit Pawar NCP Sharad Pawar Secret Meet