पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात दहावी पास होणे ही काही नवलाची गोष्ट राहिली नाही, कारण शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदव्या मिळूनही नोकऱ्या मिळत नाहीत. परंतु अनेक जण दहावी देखील पास होत नाहीत. त्यामुळे एका टोळीने गैरमार्गाचा अवलंब करीत दहावी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा गैरकारभार करीत मोठा घोटाळा केला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
बनावट दहावीचे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या या टोळीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील कृष्णा गिरी हा मुख्य आरोपी आहे. गिरी हा छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील रहीवासी आहे. काही दिवसांपूर्वी तो फोटोग्राफरचा व्यवसाय करायचा. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने महाराष्ट्र पब्लिक स्कूल नावाने एक संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना तो पास झाल्याचे प्रमाणपत्र देत होता. बनावट वेबसाईट तयार करून त्यावरून ७००हून अधिक जणांना प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले आहे.
नोकरभरतीसाठी ६०हजार रुपयांत बोगस प्रमाणपत्र दिले जात होते. यात दहावी, बारावी पासच्या प्रमाणपत्रांचा समावेश होता. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही टोळी दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. यासाठी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट देखील तयार करण्यात आली होती.
दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन), अल्ताफ शेख (रा. परांडा जि.धाराशिव) आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली आहे. तर टीईटीनंतर राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा समजला जातो आहे. बिडकीनपासून काही अंतरावर असलेल्या चितेगावमध्ये त्याने यासाठी एक कार्यालय देखील सुरू केलं होते.
भयानक गोष्ट म्हणजे कृष्णा गिरी दहावी प्रमाणपत्राच्या कलर झेरॉक्स करून त्याची बनावट कॉपी बनवायचा. यासाठी त्याने बिडकीन गावातील अनेक कलर झेरॉक्स दुकानदारांना याच्या प्रती काढून देण्याची मागणी केली होती. पण त्याच्यावर संशय आल्याने अनेकांनी नकार दिला. मग त्याने छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन कलर झेरॉक्स काढल्या होत्या अॅडमिशनसाठी तो सोशल मीडियावरून प्रचार देखील करत असे. मात्र पुणे पोलिसांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्याने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट देखील तयार केली होती.
Pune Police Crime SSC Fake Certificate Racket Burst