पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता तळजाई व सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड होण्याच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून सहकारनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच पोलिस निरीक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांना यांनी निलंबित केले.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते, त्यातच गेल्या आठवड्यात तळजाई पठार परिसरात सराईत गुंड आणि साथीदारांनी २६ वाहनांची तोडफोड केली होती. टोळक्याने सहकारनगर भागात भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला होता.अरण्येश्वर भागात टोळक्याने दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दहा ते पंधरा वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. तोडफोड करणाऱ्या गुंडांनी घरांवर दगडफेक केल्याने घबराट उडाली होती. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आयुक्तांकडून गंभीर दखल
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या महिन्यात घडलेल्या वाहन तोडफोड घटनांची तक्रार गांभीर्याने न घेणे या पोलिसांना महागात पडले आहे. सहकारनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक आता सध्या नेमणूक नियंत्रण कक्षात असलेले सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि मारुती वाघमारे, हवालदार संदीप पोटकुले, विनायक जांभळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. कर्तव्य गांभीर्याने आणि जबाबदारीने पार पडले नसल्याने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, साळगावकर यांची पोलीस नियंत्रण कक्षात दोन दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्या निलंबनाचे आदेश आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. साळगावकर यांच्या विरोधात अनेक तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे याची गंभीर दखल घेण्यात आली.