पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गेल्या महिनाभरापासून प्रचंड गुंडगिरी वाढली आहे. हाणामारी, तलवारीने वार करणे, दहशत माजविणे असे प्रकार सरस वाढले आहेत. याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी आता पोलिसांवरच कारवाई करण्यात येत आहे. पुण्यतील सदाशिव पेठ परिसरात तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. या धक्कादायक प्रकारानंतर सहकारनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षकासह ७ जणांना निलंबित केले होते. यानंतर आता पुणे पोलिस आयुक्तांनी वारजे पोलिस ठाण्याचे निरीक्षकासह सात जणांना निलंबित केले आहे. कामामध्ये हलगर्जीपणा केल्याने तसेच कर्तव्य न पार पाडल्याने ही मोठी कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.या धडाकेबाज कारवाईने पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
दिशाभूल केली
पुणे पोलिस आयुक्तांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह ७ जणांना निलंबीत केले आहे. मोक्का कारवाई बाबत संदिग्ध व अत्यंत मोघम अहवाल देवून वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या धडाकेबाज कारवाईने पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडु हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलिस उपनिरीक्षक यशवंत पडवळे, पोलिस उपनिरीक्षक जर्नादन होळकर, पोलिस नाईक अमोल भिसे आणि पोलिस नाईक सचिन कुदळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
युवकांच्या सतर्कतेमुळे
शहरातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता तळजाई व सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड होण्याच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून सहकारनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच पोलिस निरीक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांना यांनी निलंबित केले. दरम्यान, सदाशिव पेठ परिसरातील कोयता हल्ल्यातील मुख्य आरोपी शांतनू जाधव याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. प्रेमसंबंध संपविण्याच्या रागातून त्याने २७ जून रोजी सकाळी तरुणीवर जीवघेणा हल्ला केला होता. आरोपीने सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र दोन युवकांच्या सतर्कतेने तिचे प्राण वाचले होते.