मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध अॅपचे जसे दुष्परिणाम आहेत तसेच त्याचे फायदेदेखील आहेत. ट्रुकॉलरदेखील असेच एक मदतगार अॅप असल्याचे एका प्रकरणात सिद्ध झाले आहे. या अॅपमुळे दोन अट्टल दहशतवाद्यांचा छडा लावण्यात यश आले आहे.
पुणे शहरात बुधवारी दोन दशतवादी पकडले गेले. ते शहरात दीड वर्षांपासून राहत होते. जयपुरात सीरियल ब्लास्ट करण्याचा कटामधील ते आरोपी होते. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. पुणे शहरात दीड वर्षांपासून ते राहत असतानाही पोलिसांना त्याची माहिती मिळाली नव्हती. ते पोलिसांना कसे सापडले, ही बाबही आता समोर आले आहे.
कोथरुड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल नाजन आणि प्रदीप चव्हाण १८ जुलै रोजी गस्त घालत होते. त्यावेळी दुचाकी वाहनाच्या चोरी करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या दोघांना त्यांनी पकडले. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. या दोघांची चौकशी सुरु केली असता त्यांनी त्यांची नावे हिंदू सांगितले. परंतु त्यांचा फोननंबर ट्रू कॉलरमध्ये टाकल्यावर त्यांची इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे नाव समोर आले. तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज (वय ३२) फरार झाला होता. त्यांच्या घराची तपासणी केली असता काडतूस, पिस्तूल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य सापडले. त्यांचा लॅपटॉप जप्त केला.
एटीएसचे अधिकारी रतलाममध्ये
दोन्ही आरोपी मुळचे मध्य प्रदेशातील रतलामधील आहे. शुक्रवारी एटीएसच्या टीमने त्यांच्या घरी जाऊन पंचनामा केला. त्यांच्या संपत्तीची माहिती घेतली. एटीएसच्या चार अधिकारी यासाठी रतलाममध्ये पोहचले होते. प्राप्त माहितीनुसार, राजस्थानमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याचा कटात एनआयएच्या रडारवर हे दोघे होते. दीड वर्षापासून ते फरार होते. त्यामुळे एनआयएने पाच लाखांचे बक्षीस त्यांच्यावर जाहीर केले होते. आयसिसी या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्या सुफा संघटनेशी ते संबंधित होते.