पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अज्ञात स्थळी नेऊन रिक्षाचालकांनी प्रवाशांची लुटमार करण्याचे अनेक प्रकार सातत्याने घडत असतात. पोलिसांनी हेल्पलाईन नंबर्स दिलेले असतात, पण जीवाच्या भितीमुळे प्रवाशांना काहीही सुचत नाही. पण प्रवाशांची लुटमार करणाऱ्या एका रिक्षाचालकाला पुण्यातील भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागली.
पिंपरी-चिंचवड भागात एक रिक्षाचालक प्रवाशांना अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून लुटमार करायचा. भोसरीच्या पीएमटी चौकातून आपल्या रिक्षात प्रवाशांना बसवणारा दिलीप ठरलेल्या ठिकाणी न जाता भलत्याच ठिकाणी रिक्षा घेऊन जायचा. एका सुनसाण व अज्ञात ठिकाणी घेऊन गेल्यानंतर दिलीप प्रवाश्यांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून त्याच्याकडील सर्व पैसे, दागिणे किंवा महागाच्या वस्तू लुटायचा. प्रवासी सुद्धा जिवाच्या भितीने त्याला सारंकाही देऊन टाकायचे. पण अतिरेक व्हायला लागल्यानंतर एका प्रवाशाने पोलिसांत तक्रार केली.
भोसरी पोलिसांनी बराच शोध घेतला. रिक्षाचालकांची चौकशी केली. पण दिलीप हाती लागत नव्हता. कारण कुठल्याही प्रवाशाने योग्य माहिती किंवा पुरावे दिले नाहीत. कुणी रिक्षाचा नंबर अर्धवट सांगायचे, तर कुणी चेहऱ्याचे वर्णन अर्धवट सांगायचे. तर रिक्षाचे वर्णनही कुणाला निटसे आठवत नव्हते. त्यामुळे पोलिसांना रिक्षाचालकाला शोधणे अवघड जात होते. अखेर एका विशिष्ट्य वर्णनामुळे दिलीप पोलिसांच्या हाती लागला, पण त्यासाठी पोलिसांना भोसरी परिसरातील ४०० रिक्षा तपासाव्या लागल्या. एवढी कसरत केल्यानंतर आरोपीला पकडणे पोलिसांना शक्य झाले.
‘त्या’ चिन्हामुळे आरोपी जाळ्यात
प्रवासी रिक्षाचे आणि दिलीपचे अर्धवट वर्णन सांगत होते. ते सगळे वर्णन जोडून बघण्याचे काम पोलीस करत होते. अखेर एका प्रवाशाने दिलीपच्या रिक्षावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टिकर असल्याचे सांगितले. आणि त्यानंतर पोलिसांनी परिसरातील ४०० रिक्षा तपासल्या. त्यात दिलीप पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
Pune Police Arrest Auto Rikshaw Driver Crime