इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे पोलिसांना स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर ४८ तासानंतर शिरुर तालुक्यातील गुनाट गावात पकडण्यात यश आले. तो येथील गावातील शेतात लपला होता. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या. आज पुणे न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. त्याने मंगळवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. ही घटना स्वारगेट बसस्थानकात घडली होती.
गाडेचा गावातच लपल्याचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर गावात १०० पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. डॉग स्क्वायड आणि ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या १३ टीम तयार केल्या होत्या. रात्री बाराच्या सुमारास तो नातेवाईकाच्या घरी जेवायला गेला होता. प्रचंड भूक लागलीय, काही तरी खायला द्या असे त्याने सांगितले. पण, नातेवाईकांनी खायला न देता पाण्याची बाटली दिली. त्याचवेळी गाडे याने पश्चाताप झालाय, जे काही केले ते चुकीचं आहे. पोलिसांना सरेंडर व्हायचंय असं सांगितले. त्यानंतर तो बाटली घेऊन निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना गाडेची माहिती दिली.
गाडे याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये एका गुन्ह्यात आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. आरोपी गेल्या दोन दिवसांपासून फरार होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.