पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दिसून येतात. यात आपल्या महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात तर या घटना दररोजच घडत असून महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे, असे दिसून येते. अगदी सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विनयभंग सर्रासपणे होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे, खरे म्हणजे पोलीस देखील या संदर्भात कठोर कारवाई करत आहेत. परंतु तरीही या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत, असे दिसून येते. पुणे शहरात महिला वाहकाच्या विनयभंगाची घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
सातत्याने पाठलाग
पुण्याची शहर बससेवा असलेल्या पीएमपीएमएलमध्येच काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. सदर महिला व आरोपी दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. वास्तविक पाहता ती तरुणी आपापल्या कामांमध्ये व्यस्त असे परंतु हा इसम सारखा तिच्या मागावर होता, कारण त्याला ही तरुणी आवडत असल्याने गेल्या २ महिन्यांपासून तो तिचा पाठलाग करत होता. पुण्यातील पोलिस ठाण्यात या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे.
प्रेमाचा स्वीकार कर
पिडीत तरूणीच्या तक्रारीनुसार, सुनील भालेकर (वय ४३) या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. खरे म्हणजे हा सगळा प्रकार जून महिन्यापासून सुरू होता. भालेकर हा पीडितेच्या कामाच्या ठिकाणी ओळख झालेला सहकारी असून त्याने मागील २ महिन्यांपासून महिलेचा पाठलाग केला. तसेच अनेक वेळा “तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर” असे म्हणत विनयभंग करत केला. असे वारंवार घडत असल्यामुळे अखेर महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे अशाच प्रकारचे घटना पुणे शहरात मागील महिन्यात घडली होती असे प्रकारात सर्रास आणि वारंवार होत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
pune pmpml bus women conductor molestation crime