पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर बससेवा असलेल्या पीएमपी बसवर अचानक झाड कोसळले आहे. धावत्या बसवर अचानक झाड कोसळल्याने बसमध्ये एकच धावपळ उडाली. बस चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्रवासी बचावले.
अचानक मोठा आवाज
पीएमपी म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळाची अप्पर ते निगडी ही बस फर्ग्युसन रस्त्यावरून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जात होती. सायंकाळची वेळ असल्याने सर्वच रस्त्यावर मोठी गर्दी होती. तसेच वाहनांमध्ये देखील गर्दी झाली होती या बस मध्येही सुमारे ३५ प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, बस नामदार गोपाळ कृष्ण गोखले मार्ग म्हणजेच फर्ग्युसन कॉलेज जवळील थांब्यावर थांबली. तेव्हा प्रवाशी उतरल्यावर धावत्या पीएमपी बसवर झाड कोसळल्याची भयानक घटना घडली. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यामध्ये बसचालकाला किरकोळ जखम झाली असून इतर प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. (फर्ग्युसन) रस्त्यावर ही घटना घडली.या थांब्यावरून काही प्रवासी बसमध्ये चढले. मात्र, बस निघत असताना अचानक मोठा आवाज झाला. फुटपाथवर असलेले जीर्ण गुलमोहराचे झाड मोडून बसवर कोसळले. झाडाचा बुंधा फुटपाथवर पडला. तर, पुढील फांद्या बसच्या काचा व समोरच्या बाजूवर आदळल्या. यामुळे सर्व प्रवासी घाबरले.
पोलिस, अग्निशमन दलाची धाव
हा रस्ता वर्दळीचा आणि रहदारीचा असला तरी सुदैवाने झाड कोसळले किंवा झाडाखाली गर्दी नव्हती. तसेच बसवर झाड कोसळत असतानाच बस चालक आप्पाराव जाधव यांनी प्रवाशांना भराभर सूचना दिल्या. त्यामुळे प्रवासी मागच्या बाजूला पळाले. त्याचवेळी बस चालक जाधव यांनी प्रसंगावधान राखत बस थांबवली. पण या घटनेत त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. संपूर्ण झाड बसच्या मध्यावर पडले असते तर मोठा अनर्थ झाला असता. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलास घटनेची माहिती देण्यात आली. बसवर कोसळलेले झाड बाजूला करण्यात आले. त्याचबरोबर बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने पाठविण्यात आले. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. यामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. जोरदार पाऊस नसतानाही मात्र एवढे मोठे झाड कसे काय कोसळले? याची चर्चा बराच काळ सुरू होती.
Pune PMP City Bus Tree Collapse FC Road Accident