पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओतून सिक्रेट मिशन आलो असून मी आयएएस असल्याचे भासविणाऱ्या एका इसमाला पुणे येथे अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव डॉ. विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे (वय ५४, रा. रानवारा रो हाऊस, तळेगाव दाभाडे, पुणे) असे आहे.
काही दिवसांपूर्वीच काश्मीर खोऱ्यात एका तोतया अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्यानेदेखील स्वत:ला पीएमओ कार्यालयातून आल्याचे सांगून अतिसंवेदनशील भागाची पाहणी केली होती. या घटनेला काही महिन्यांचा काळ लोटत नाही तोच पुण्यात या तोतया अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे. वासुदेव तायडे यांनी आपले खरे नाव लपवून डॉ. विनय देव असे नाव लावले होते. आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात गोपनीय काम करत असल्याचे तो लोकांना सांगत होता.
प्राप्त माहितीनुसार, २९ मे रोजी औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटी येथे औंध पुणे बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी पाठवण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून हजर असलेला डॉ. विनय देव हा व्यक्ती स्वतः आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी पदावर गोपनीय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्याने सांगितलेल्या माहितीवर संस्थेच्या पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली. मात्र, त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तो सांगत असलेल्या त्यांच्या आयएएस पदाबाबत त्यांना संशय वाटला.
फसवणूक केल्याची कबुली
तायडे याच्या वागण्यावरून संशय आल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शोध घेऊन तायडेला अटक केली. त्याने पीएमओतील अधिकारी सांगून फसवणूक केल्याची कबुली दिली. या प्रकरणी चतुशृंगी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Pune PMO Fake Officer Arrested