पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे महापालिच्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. तब्बल ७ वर्षांनी त्यांना त्यांचे निवृत्ती वेतन मिळाले आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते विविध पातळ्यांवर पाठपुरावा करीत होते. अखेर हे काम मार्गी लागले आणि बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत.
यासंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि आमदार रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या की, पुणे महानगरपालिकेतील शिक्षण विभागात सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या जवळपास ६०० कर्मचाऱ्यांची निवृत्ती लाभाची रक्कम पुणे महानगरपालिकेने त्यांच्या खात्यात वर्ग केली नव्हती. २०१६ ते २०२० या दरम्यान निवृत्त झालेले हे सर्व कर्मचारी होते. आपल्या निवृत्तीनंतर सहा ते सात वर्ष होऊन देखील ही रक्कम त्यांना न मिळाल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. याबाबत डिसेंबर महिन्यात आयुक्तांसमवेत बैठक केल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे मला आश्वासन दिले होते, परंतु सदर काम न झाल्यामुळे गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत याबाबतची बैठक घेतली आणि आनंदाची बाब म्हणजे आज या सर्व ६०० कर्मचाऱ्यांची त्यांच्या निवृत्ती लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. निश्चितच आपल्या आयुष्यभर केलेल्या सेवेची जमापुंजी मिळाल्याचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधानकारक होता.