पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे तसेच पिंपरी –चिंचवड येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करून जनतेला समर्पित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात दाखल झाले आहेत. विमानतळावर त्यांचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदींनी स्वागत केले. त्यानंतर मोदी हे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आले. तेथे त्यांनी पूजा अर्चा केली. अभिषेक केल्यानंतर पंतप्रधानांनी श्रीगणेशाची आरती केली. या काळात सर्वसामान्यांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असून वाहतुकीसाठी अनेक मुख्य रस्ते बंद ठेवण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुजा व्हिडिओ
असा आहे पंतप्रधानांचा दौरा
गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मोदी हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. पुरस्कार सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी हे दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा कंदील दाखवून, विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प 2 ला हिरवा झेंडा दाखवून, पंतप्रधान, श्री मोदी हे पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत मेट्रो रूट असणार आहे. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणांना जोडून, या प्रकल्पांचा लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाईल. सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. यासोबतच, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्या सुमारे 1190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट रोजी असल्याने, लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान केला जाणार आहे. पंतप्रधान या पुरस्काराचे 41 वे मानकरी असतील. या पूर्वी या मानाचे पुरस्कार प्राप्त करणारे, डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर नारायण मूर्ती, डॉ. ई. श्रीधरन या मान्यवरांचा समावेश आहे.