पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखादा प्रकल्प प्रशासन एकतर वेळेत पूर्ण करत नाही. तीन वर्षांचे काम आठ वर्षांमध्ये कसेबसे पूर्ण होते. आणि आता त्याचे लोकार्पण होण्यासाठी मात्र आणखी वर्षभरापासून नेत्यांची प्रतिक्षा करावी लागते. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सध्या पुणेकर त्याचा अनुभव घेत आहेत.
पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत ग.दि. माडगुळकर नाट्यगृह उभारण्यात आले. या सभागृहाचे काम २०१४ मध्ये सुरू झाले आणि ते २०१७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करतील ते ठेकेदार कसले. कासवगतीने झालेले काम पूर्ण व्हायला आठ वर्षे लागली. आणि गेल्यावर्षी जूनमध्ये नाट्यगृह बांधून पूर्ण झाले. पण आता त्याच्या उद्घाटनासाठी गेल्या दहा महिन्यांपासून नेत्यांच्या तारखा मिळत नाहीत. त्यामुळे कलावंतांसह सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
वर्षभरात दोनवेळा निवडणुकीच्या प्रचारांसाठी भाजप नेत्यांच्या मोठ्या सभा झाल्या. पण साध्या उद्घाटनासाठी त्यांना वेळ मिळत नाही, हे दुर्दैव आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. शहरातील महापालिकेच्या इतर नाट्यगृहांपेक्षा गदिमा नाट्यगृह वेगळे आहे. यामध्ये एक मिनी थिएटर, ॲम्फी थिएटर, प्रशस्त सभागृह, कलादालन आणि मल्टिप्लेक्ससारखे थिएटर आहे.
शहरातील नाट्यगृहांमध्ये नाटकांव्यतिरिक्त इतर खासगी कार्यक्रम जास्त होत असतात. त्यामुळे नाट्यकलावंतांना व कलाकारांना कला सादरीकरणास शहरात वाव मिळत नाही. त्यामुळे अनेक कलाकार पुण्यातील नाट्यगृहांना प्राधान्य देतात. नाट्यकलाकारांना नाटकांच्या तालमीला जागा नाही. कला सादरीकरणासाठी कलादालन असावे, अशी शहरातील कलावंतांची इच्छा होती. त्यांची प्रतीक्षा गदिमा नाट्यगृहाद्वारे पूर्ण होणार आहे. मात्र, नाट्यगृहाचे काम पूर्ण होऊनही अद्याप उद्घाटनासाठी किती प्रतीक्षा पाहावी, अशी विचारणा कलावंतांकडून केली जात आहे.
दोनदा रद्द झाले
नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी नेत्यांची दोनदा वेळ मिळाली होती. मात्र, काही कारणांमुळे नेत्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे उद्घाटन रखडले. केवळ नेत्यांना वेळ मिळत नसल्याने नाट्यगृहे कुलूपबंद ठेवल्याने शहरातील कलाकारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
खर्च वाढला
पाच हजार चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह बांधण्यात आले आहे. सुरुवातीला ३७ कोटी २५ लाख रुपयांचा हा प्रकल्प होता. मात्र तीन वर्षांचे काम आठ वर्षांवर गेल्यामुळे खर्चही ६६ कोटींवर गेला.
Pune Pimpri Chinchwad Theatre Opening Leaders Politics