पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपरी चिंचवड परिसरातील रावेतमध्ये आज भीषण दुर्घटना घडली. रस्त्यावरील होर्डिंग्ज कोसळून तब्बल ५ जण ठार झाले आहेत. त्यात ४ महिला आणि १ पुरुष यांचा समावेश आहे. तर, ३ जण जखमी झाले आहेत. यासंदर्भात सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांनी माहिती दिली आहे.
आज सायंकाळच्या सुमारास अचानक हवामान बदल झाला. सोसाट्याचा वारा वाहू लागला. अवकाळी पाऊसही कोसळला. यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. त्यातच रस्त्यालगत असलेले भलेमोठे होर्डिंग कोसळले. या हर्डिंग खाली ८ जण अडकले. त्यात ४ महिला आणि १ पुरुष यांचा मृत्यू झाला. तर, ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महापालिका अग्निशमन विभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात भाग घेतला.
होर्डिंगचा भला मोठा सांगाडा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. बराच वेळ झाल्यानंतर होर्डिंगखाली दाबलेले नागरिकांना बाजूला करण्यात यश आले. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळेही मदतकार्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, या दुर्घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत आणि चिंतेचे वातावरण तयार झाले. अवैध होर्डिंगचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच, नागरिकांनी याबाबत तीव्र संतापही व्यक्त केला आहे. महापालिकेने यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1647976142396342272?s=20
Pune Pimpri Chinchwad Hoarding Collapse 5 Death 3 Injured