पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई शहरात एकट्या दुकट्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून त्यांना लुबाडण्याच्या दुर्घटना घडतात, इतकेच नव्हे तर ते ज्येष्ठ नागरिकाला जिवे मारून त्याचे संपत्ती हडप करण्याचे प्रकार देखील उघड झाले आहे. पोलिसांनी याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. परंतु आता पोलीस हे जनतेचे मित्र असल्याची भावना नागरिकांमध्ये अधिक प्रमाणात रुजवण्यासाठी पुणे शहरात एक आगळावेगळा आदर्श वत असा प्रकल्प तथा योजना पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे. घरात एकटेच असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना औषध आणून देण्यापासून ते त्यांना हवी असलेली सर्व प्रकारची मदत करण्यासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ‘ज्येष्ठानुबंध’ सेलद्वारे खाकी वर्दी आता पालकाची भूमिका बजावणार आहे.
पहिला सेल हिंजवडीत
पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड ही आता उद्योगनगरीदेखील ज्येष्ठांचे शहर म्हणून उदयास येत असल्याने एकट्या राहणाऱ्या वृद्धांसाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष सेल स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरातील पहिला ज्येष्ठानुबंध सेल हिंजवडी पोलीस ठाण्यांतर्गत वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी सुरू केला असून, येत्या काही दिवसात शहरातील सर्व १८ पोलीस ठाण्यांमध्ये हा सेल कार्यरत करण्यात येणार आहे.पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक कक्षाची सुरुवात करण्यात आली होती. या कक्षामध्ये दररोज ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आपापल्या समस्या घेऊन आयुक्तालयात येत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. ज्येष्ठ नागरिकांना नजीकच्या पोलीस ठाण्यातूनच तत्काळ मदत मिळावी, यासाठी यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, अनेक ज्येष्ठ नागरिक हे घरात एकटे किंवा जोडपे असे राहात असून, त्यांची मुले नोकरी-शिक्षणासाठी परदेशात किंवा अन्यत्र राहात असल्याने त्यांना मदतीची नेहमीच गरज भासते. ज्येष्ठ नागरिक घरात एकटेच असल्याने त्यांना किरकोळ कामांसाठीदेखील कोणावर तरी अवलंबून राहावे लागते.
अशी टळणार फसवणूक
ज्येष्ठ नागरिकांना मदतीच्या नावाखाली फसविल्याचे अनेक प्रकार मागील काही दिवसांमध्ये समोर आले होते. त्यामुळे किमान १० ज्येष्ठ नागरिकांमागे एक कर्मचारी नेमण्यात यावा, अशी कल्पना पोलीस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी मांडली होती.या संदर्भात उपायुक्तांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षाचे काम पाहणारे फौजदार राजेंद्र होनराव यांनी शहरातील वृद्धांबाबतची माहिती सादर केली होती.शहरात विविध ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. या सगळ्या संघांचा मिळून एक महासंघदेखील असून, यातील बहुतांश जणांची नोंद पोलीस आयुक्तालयात झालेली आहे. त्यामुळे शहरात किती ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यापैकी किती जण एकटे किंवा दुकटे राहात आहेत. कोणाची मुले परदेशात आहेत. यातील कितीजणांना दुर्धर आजार आहेत, असा एक डेटा पोलिसांनी संकलित केला आहे.ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक होत आहे. तसेच एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने, घरात मदत करण्याच्या बहाण्याने ते केअर टेकरकडूनच गंडा घालण्याचे गुन्हे शहरात यापूर्वी दाखल झाले आहेत. त्यामुळे या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी आता पोलीसच पालकाची भूमिका बजावणार आहेत.