इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकूळ असताना प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये नेले होते. पण, अगोदर १० लाख रुपये भरावे, त्यानंतरच दाखल केले जाईल असा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे महिलेला दुस-या रुग्णालयात उपचारासाठी प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, येथे दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आता या घटनेनंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
या घटनेनंतर आता रुग्णालयातील बाहरे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक येणारे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्य व्दाराजवळ तपासून आता सोडले जात आहे. मुख्य व्दाराजवळ पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांकडून आज रुग्णालायत चौकशी करण्यात येणार आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहे. तसेच भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॅाक्टरांचा जबाब घेतला जाणार आहे. त्यानंतर अहवाल आरोग्य खात्याला दिला जाणार आहे.
रुग्णालयाचे प्रशासनाने दखल घेतली नाही
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अनिशा भिसे यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये आत्ता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील असे सांगितले. मात्र प्रशासन ऐकायला तयार नव्हतं. काही वेळानंतर पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला. मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवले गेले. त्यातच त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र त्यांचा करुण अंत झाला.
थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता
या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या. सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्या मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे. ज्याची कल्पनाच न केलेली बरी असे नागरिकांनी म्हटले आहे.
आमदार अमित गोरखे यांची तक्रार
या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी पुण्याचे सहपोलिस आयुक्त रंजनकुमार यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.