इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः पुण्यातील हडपसर भागात असलेल्या वैभव टॉकीज येथे भीमाशंकर सोसायटीच्या तीन मजली इमारतीला आज सकाळी दहा वाजता आग लागली. तीन मजली असलेल्या या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर जिन्याच्या जागेत काही रॅक होते. तिथे काही फोटो फ्रेमसाठी बनवण्यात येणाऱ्या सामग्रीला अचानक आग लागली. काहीच क्षणात या आगीने रौद्र रूप धरण केल्याने याठिकाणी धुराचे आणि आगीचे मोठे लोण पाहायला मिळाले. दरम्यान, त्याच मजल्यावर राहत असलेल्या एका कुटुंबातील दोन लहान मुले या आगीत अडकून पडली होती. या वेळी येथे उपस्थित एका स्थानिक तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट या आग लागलेल्या इमारतीवर चढून अडकलेल्या या दोन्ही मुलांची सुखरूप सुटका केली.
या संपूर्ण प्रकारचा थरार उपस्थितांनी मोबाइलमध्ये कैद केला आहे. तरुणाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे या दोन्ही मुलांचा जीव वाचल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याच्या कृतीचे कौतुक केले. सध्या ‘सोशल मीडिया’वर हा व्हिडीओ व्हायरल होत असून या तरुणाच्या धडसाचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, आगीच कारण अद्याप समजलेले नसले, तरी पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जलद प्रतिसादामुळे सर्व रहिवाशांना इजा किंवा जीवितहानी न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. आग पूर्णपणे आटोक्यात आली असून जीवितहानी झालेली नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी ज्वाला आटोक्यात आणण्यासाठी त्वरीत काम केल्याने आजूबाजूच्या परिसरात ही आग पसरली नाही.