विशेष प्रतिनिधी, पुणे :
कोरोना काळात अनेकांचे उद्योग व्यवसाय ठप्प झाले. तसेच बहुताश लोकांच्या काही तरी कारणामुळे नोकऱ्या देखील गेल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहेत, परंतु एखाद्याला नोकरीवरून काढल्याचा राग त्याने आपल्या मालकावर काढल्याची घटना दुर्दैवीच म्हणावी लागेल. या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पुणे शहरानजिक पिंपरी-चिंचवड शहरात कामावरून काढून टाकल्याच्या रागातून वाहन चालक विनोद भस्के आणि त्याचा भाऊ अंकित भस्के याने क्रेटा व इनोव्हा अशा २२ लाखांच्या दोन गाडया पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेने भोसरी एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद भस्के या वाहन चालकाला काही महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. वास्तविक संशयीत आरोपी विनोद भस्के हा मालकाकडे गेल्या तीन वर्षांपासून वाहनचालक म्हणून काम करत होता. दरम्यान, विनोद याने मालकाची एक गाडी गावाकडे जायचे म्हणून दहा दिवसांच्या बोलीवर बाहेरगावी नेली, परंतु प्रत्यक्षात महिना झाला तरी ही गाडी आणून दिली नाही. त्यामुळे मालकाने आपल्या गाडी शोध असताना ते विनोदच्या घरापर्यंत पोहचले. दरम्यान, बाहेरगावी नेलेल्या गाडी विषयी विचारले असताना त्याचा भाऊ अंकित याने त्यांच्याशी वाद घातला, तसेच बाहेरगावी नेलेल्या स्विफ्ट गाडीचे चालकाने नुकसान करून आणून दिले. त्यानंतर विनोदला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. या घटनेचा राग येऊन चार दिवसांपूर्वी आरोपी विनोद आणि त्याचा भाऊ अंकित यांनी वाहनमालक राहात असलेल्या सोसायटीमध्ये जाऊन क्रेटा आणि इनोव्हा या दोन गाड्या पेटवून दिल्या आहे. दोन्ही मोटारी जळून खाक झाल्या असून घटनेप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या जाळपोळीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.