पुणे – एसएसबीच्या वतीने युपीएससी परीक्षा पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेतून पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे याची वायू दलात निवड झाली आहे. ८ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या निकालात सर्वेशची निवड झाल्याचे जाहीर झाले असून दीड वर्षांचे फ्लाईट कॅडेट म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर तो विंग ऑफिसर पदावर कार्यरत होईल.
सर्वेश नावंदेच्या निवडीने देशसेवेच्या शिरपेचात महाराष्ट्रचा मनाचा तुरा खोवला आहे. सर्वेशची वाटचाल ही अत्यंत प्रेरणादाई आहे. पुणे येथील विखे पाटील मेमोरियल येथे सर्वेशचे इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले. बीएससी च्या प्रथम वर्षात असतांना त्याची एनसीसी मध्ये निवड झाली.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलानाच्या निमित्ताने रॅलीमध्ये भारतातून एअर फोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक सर्वेशने पटकावले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पदक बहाल करून सर्वेशचा गौरव केला होता. याच कार्यक्रमात तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, तिन्ही सेवादलाचे प्रमुख आदींनी त्याचे अभिनंदन केले होते.
सर्वेश हा क्रीडा विभागात कार्यरत असलेल्या कविता सुभाष नावंदे यांचा मुलगा असून, कुटुंबात कुठलेही डिफेन्सचे वातावरण नसताना जिद्द आणि चीकाटीने आणि प्रामाणिक मेहनतीने सर्वेशने हे यश मिळवले आहे. एअर फोर्समध्ये जाण्यासाठी सर्वेश गेली पाच वर्ष अविरत प्रयत्न करत होता. अथक प्रयत्नांनी त्याने अखेर विजयश्री खेचून आणली.
अपयश आले तरी यश मिळेपर्यंत कायम लढत राहणे हाच यशाचा मार्ग आहे अशी भावना निवडीनंतर सर्वेशने व्यक्त केली. सर्वेश स्वावलंबी आणी ध्येयाने पछाडलेला होता आणि त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करताना मी त्याला पाहिलंय, आपला मुलगा देशसेवेत रुजू होतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया सर्वेशचे आई वडील कविता सुभाष नावंदे यांनी यावेळी दिली.