इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुली सातत्याने प्रगतीपथावर आहेत. कोणत्याही परीक्षांचे निकाल लागले की, हे आपल्याला दिसतंच. शिक्षण क्षेत्रात पुढे असण्यासोबतच आता मुली नोकरीच्या नेहमीच्या वाटा सोडून वेगळ्या वाटा निवडताना दिसतात. एखाद्या कंपनीत उच्च पदावर काम करण्यापासून ते स्वतःची एखादी कंपनी सुरू करण्यापर्यंत महिलांनी मजल मारली आहे. महिलांच्या या कर्तृत्वाचे योग्य ते कौतुकही होताना दिसते. नुकताच पुण्यात वाढलेल्या आणि आता परदेशात स्थित असलेल्या एका मुलीचा थेट अमेरिकेत सन्मान झाला.
पुण्यात वाढलेल्या नेहा नारखेडेचे नाव नुकतेच फोर्ब्सच्या स्वकर्तृत्वावर मोठे झालेल्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. नेहा ही सॉफ्टवेअर कंपनी कॉन्फ्लुएंट आणि फ्रॉड डिटेक्शन कंपनी ऑसिलेटरची सहसंस्थापक आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी नेहा नारखेडे अमेरिकेत गेली.
कोण आहे नेहा नारखेडे?
नेहा नारखेडे ही मूळची पुणेकर. सुरूवातीचे शिक्षण तिथेच घेतल्यावर २००६ मध्ये मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेला गेली. दोन वर्षे तिने ओरॅकलमध्ये टेक्निकल स्टाफ म्हणून काम केले. यानंतर तिने लिंक्ड इनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणूनही अनुभव घेतला. तिथल्या चांगल्या कामगिरीमुळे तिने अवघ्या वर्षभरात वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंतापद मिळवले. वर्षभरानंतर ती लिंक्डइनवर स्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चर लीड बनली. लिंक्डइनवर असताना नेहा आणि तिच्या टीमने Aapche Kafka, साइटचा डेटा हाताळण्यासाठी डिझाइन केलेली एक ओपन सोर्स मेसेजिंग सिस्टम विकसित केली.
२०१४ मध्ये नेहा आणि तिच्या लिंक्डइन सहकर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आणि काहीतरी नवीन ठरवले. त्यांनी मिळून कॉन्फ्लुएंट सुरू केले. ही कंपनी क्लाउड सोल्यूशन्स पुरवते. प्रदाता असून वैयक्तिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात डेटावर प्रक्रिया करण्यास मदत केली आहे. नेहा पाच वर्षे कंपनीची मुख्य तंत्रज्ञान आणि उत्पादन अधिकारी होती. सध्या ती कंपनीच्या संचालक मंडळाची सदस्य असून त्यानंतर नेहाने २०२१ मध्ये सचिन कुलकर्णीसोबत कॉन्फ्लुएंटनंतर ऑसिलर सुरू केले. ग्राहकाची फसवणूक होऊ नये, यासाठी ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत नेहाची जवळपास १६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि सध्या ती कंपनीच्या सीईओ पदावर आहे.
एकूण संपत्ती ४२ हजार कोटी
नेहाची एकूण संपत्ती ५२० दशलक्ष डॉलर म्हणजे तब्बल ४२ हजार कोटी रुपये असून ती क्लाउड सेवा पुरवणारी सॉफ्टवेअर कंपनी – कॉन्फ्लुएंटची सहसंस्थापक आणि बोर्ड सदस्य आहे. कॉन्फ्लुएंटचे मूल्य ९.१ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ७५ हजार कोटी रुपये असून नेहाची कंपनीत ६% हिस्सेदारी आहे.
वडिलांकडून प्रेरणा
आपल्या या प्रवासासाठी वडिलांकडून प्रेरणा मिळाल्याचे नेहा सांगते. तिचे वडील तिला लहानपणी भरपूर पुस्तकं आणून द्यायचे आणि तिला यशस्वी स्त्रियांच्या कथा सांगायचे. यामुळे मलाही काहीतरी करण्याची ईच्छा झाल्याचे ती सांगते.