नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे-नाशिक नविन रेल्वे मार्गासाठी भुसंपादनाच्या प्रक्रियेसाठी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत सिन्नर तालुक्यातील मौजे बारागावपिंप्री येथील शेतकरी श्रीमती कमळाबाई कुऱ्हाडे यांनी आपला गट नंबर 673 चे 0.5900 हेक्टर आर क्षेत्राचे जिल्ह्यातील पहिले खरेदीखत नोंदविले आहे, इतर भुधारकांनीही संमतीने सहा महिन्यात वाटाघाटी व सहमतीने खरेदीखत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, पुणे नाशिक दुहेरी मध्यम द्रुतगती ब्राडगेज लाईनच्या विद्युतीकरण व बांधकामासाठी प्रस्तावित खाजगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी सिन्नर तालुक्यातील मौजे बारागावपिंप्री येथिल शेतकरी श्रीमती कमळाबाई कुऱ्हाडे यांच्या गट नंबर 673 चे 0.5900 हेक्टर आर क्षेत्रासाठी जिल्हास्तरीय समितीने 1,01,84,760/- (अक्षरी रूपये एक कोटी एक लाख चौऱ्यांऐंशी हजार सातशे साठ फक्त) रुपयांची मोबदला रक्कम निश्चित केली आहे.
श्रीमती कुऱ्हाडे व महारेल व महसुल अधिकारी यांनी दुय्यम निबंधक कार्यालय, सिन्नर येथे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचे नाशिक जिल्हातील पहिले खरेदीखत नोंदविण्यात आले आहे. या खरेदीखत नोंदविण्यासाठी पुढील 6 महिन्यांसाठीचा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे. तसेच पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पात जमीन संपादित होणाऱ्या इतर भुधारकांनीही वाटाघाटीतून थेट खरेदी करण्यास संमती देवून खरेदीखत लवकरात लवकर नोंदविण्यास सहाकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.