पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे-नाशिक महामार्गावर अतिशय भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या एसयूव्हीने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या ग्रुपला जबर धडक दिली. या घटनेत ५ महिलांचा मृत्यू झाला असून, ३ जण गंभीर जखमी आहेत. तर, अन्य १० महिलाही जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोली गावाजवळ सोमवारी रात्री १०.४५ वाजता ही घटना घडली. येथे १७ महिला महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. हे सर्वजण पुणे शहरातून ५० किमी अंतरावर आले होते आणि महामार्गाच्या पलीकडे असलेल्या विवाह मंडपात केटरिंगच्या कामासाठी जात होते. या महिला रस्ता ओलांडत असताना पुण्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एसयूव्हीने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेनंतर एसयूव्ही चालकाने वेग वाढवला आणि यू-टर्न घेऊन पुन्हा पुण्याच्या दिशेने परतला.
या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय अन्य तीन महिला गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी एसयूव्ही चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. अन्य १३ महिलाही जखमी आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, भरधाव एसयुव्ही कारने महिलांना महामार्गावरच चिरडले. रात्रीच्या अंधारात अतिशय भयावह स्थिती महामार्गावर होती. रक्ताचा सडा आणि महिलांचे मृतदेह महामार्गावर पडले होते.
सुनंदा सटवा गजेशी, सुशीला वामन देढे (रा. रामटेकडी शांतीनगर), इंदुबाई कोंडीबा कांबळे (रा. किरकटवाडी, सिंहगड रोड), सायराबाई प्रभु वाघमारे (हडपसर) अशी मृत महिलांची नावे आहेत. तर, गंभीर जखमी असलेल्या महिलांमध्ये शोभा राहुल गायकवाड, सारीका देवकर, वैषाली धोत्रे, शोभा शिंदे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर राजगुरूनगरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या सर्व महिला स्वारगेट येथून बसने आल्या होत्या. विवाह सोहळ्यात केटरिंगचे काम या सर्व जण करतात. रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडल्याने महिलांनी आरडाओरडा केला. अंधारात हा सर्व प्रकार घडला. महामार्गावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
Pune Nashik Highway Road Accident 5 Women’s Death