पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती होत असलेल्या देशातल्या ५१ हजार उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. नागपुरात हिंगणा स्थित केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मेन्स क्लब ग्रुप सेंटर इथं आयोजित रोजगार मेळाव्यात सुमारे २५० उमेदवारांना नियुक्तीपत्रं वितरण कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्रांचे वितरण उमेदवारांना करण्यात आले.
रोजगार मेळावा हा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची पंतप्रधानांची वचनबद्धता पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. रोजगार मेळा रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि युवा सक्षमीकरण आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्त उमेदवारांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लोकशाहीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या निवडणुकांच्या बंदोबस्तामध्ये, नैसर्गिक संकटाच्या काळी आपत्ती व्यवस्थापनामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा निमलष्करी शासकीय सेवेमध्ये जे नव्याने उमेदवार भरती झाले आहे त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा देतो असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात प्रशांत जांभुळकर, पुलिस उप महानिरीक्षक, ग्रुप केन्द्र, केन्द्रीय राखीव पोलीस बल, नागपुर .पी.एस. रणपिसे, भा.पो.से. पोलीस महानिरीक्षक, पश्चिम सेक्टर, मुंबई, आई. लोकेद्र सिंह, उप महानिरीक्षक, रेंज सीआरपीएफ नागपूर, डॉ. मनोज कुमार सिन्हा, उप महानिरीक्षक (चिकित्सा) सयुक्त अस्पताल, सीआरपीएफ नागपूर, जी.डी.पंढरीनाथ, कमाण्डेन्ट, समूह केंद्र, सीआरपीएफ, नागपूर आणि श्रीमती सियाम होई चिंग मेहरा, कमाण्डेन्ट २१३ (महिला) बटालियन सीआरपीएफ त्यांच्या हस्तेही नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये CRPF, CISF, BSF, ITBP, SSB, AR, ब्यूरो ऑफ माइन्स अशा विविध विभागातील यशस्वी उमेदवार उपस्थित होते.
पुण्याजळील तळेगाव इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रावरही आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रोजगार मेळाव्यात एकंदर २७१ जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलासह सीमा सुरक्षा दल, भारत तिबेट सुरक्षा दल आणि सीमा सुरक्षा बल यासारख्या निमलष्करी दलातील नोकऱ्यांचा त्यात समावेश आहे. विकसित भारताचे अंतिम उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपले कर्तव्य आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केले.
आगामी २५ वर्षांचा काळ हा भारताचा अमृत काळ असून या काळात देशाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या तुमच्या सारख्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना अमृत रक्षक म्हणून ओळखले जाणार असल्याचे प्रारंभीच स्पष्ट करून डॉ. कराड पुढे म्हणाले की, सरकारी कर्मचारी म्हणून काम करताना नागरिकांना योग्य त्या सेवा सुविधा पुरवतानाच देशाचा सन्मान वाढवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची राहणार आहे.
संरक्षण क्षेत्रात काम करताना या जबाबदारीचे भान अधिक ठेवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रामुख्याने संरक्षण क्षेत्रात काम करताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. आपल्या कुटुंब आणि समाजाला पुढे नेतानाच देशाला पुढे नेण्याची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठ पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.
Pune Nagpur Government Service Appointment Letter