पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे महानगरपालिकेने यंदाच्या बजेटमध्ये ८ नव्या उड्डाणपुलांची घोषणा करून विकासाच्या उड्डाणाचा संकल्प सोडला आहे. यासोबतच पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळासाठी तब्बल ४७० कोटींची तरतूद केली आहे.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आज २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल एक हजार कोटींनी वाढ असलेला अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. गेल्यावर्षी ८ हजार ५९२ कोटींचा अर्थसंकल्प होता. यंदा त्यात वाढ होऊन ९ हजार ५४५ कोटींचा झालेला आहे.
नव्या बजेटमध्ये वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सिंहगड रोड उड्डाणपूल, नदी पुनर्जीवन प्रकल्प, डॉग पार्क, हायड्रो ऊर्जा प्रकल्प, चार्जिंग स्टेशन उभारणे आदींचा समावेश आहे. यासोबतच पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारण्यासाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. नवीन 23 गावांच्या समावेशामुळे यंदाच्या बजेटमध्ये यावर्षी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.
गतवर्षीपेक्षा यंदाच्या बजेट मध्ये ९२३ कोटींची भर घालण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद ही पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आली आहे. तसेच पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. रस्त्यांसाठी ८०० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. वाहतूक नियोजन व प्रकल्पांसाठी ५९० कोटी रुपये तर पीएमपीएलसाठी ४५९ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. पाणी पुरवठ्यासाठी १ हजार ३२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मलनिःसारणासाठी ८२१ कोटी
पुणे शहरातील मलनिःसारणासाठी ८१२ कोटी रुपये तर घनकचरा व्यवस्थापनसाठी ८४६ कोटी जाहीर करण्यात आले आहेत. पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी ४६८ कोटी रुपये तर आरोग्यासाठी ५०५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
आठ नवे उड्डाणपूल
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात आठ नवीन उड्डाणपूल उभारणार असल्याची घोषणा या बजेटमध्ये करण्यात आली आहे. नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी विशेष तरतूद देखील केली आहे. तसेच पगार आणि पेन्शन वर सुमारे ३१०० कोटी खर्च होणार आहेत.
Pune Municipal Corporation Budget 8 New Flyovers