पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यावर आधारित अनेक मिम्स आपण वाचत असतो. बरेचदा त्यात अतिरेकही वाटतो. पण काही बाबतीत ते अगदी खरं असतं. याची प्रचिती देणारी घटना अलीकडेच पुण्यात घडली. पुणे महानगरपालिकेने एका भिंतीवर जनजागृती करणारे सुविचार व चित्रे रेखाटली. उत्तम चित्रकाराकडून ते काम करून घेतलं. पण ज्या सोसायटीच्या भिंतीवर मनपाने हे काम केले, त्या सोसायटीने महापालिकेलाच नोटीस पाठवली आहे.
मुळात नियमानुसार महानगरपालिकेने संबंधित सोसायटीची परवानगी घ्यायला हवी होती आणि त्यानंतरच हे काम करायला हवे होते. पण तसे न करणे आता त्यांच्यासाठीच डोकेदुखी ठरू लागली आहे. पुण्यातील स्वप्नशिल्प हाऊसिंग सोसायटीच्या चारशे फुटांच्या भिंतीवर तुम्हाला काही सुविचार वाचायला मिळतील. बेटी बचाओ बेटी पढाओ, ओला सुका कचरा वेगळा करा, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, मुलगी शिकली प्रगती झाली असे काही सुविचार भिंतीवर सुवाच्छ अक्षरांमध्ये लिहीण्यात आले आहेत. या अक्षरांना सुरेख अश्या चित्रांची जोड देण्यात आली आहे. महानगरपालिका जनजागृतीसाठी हे काम करीत असते, हे आपण सारेच जाणतो. पण कोथरुडमधल्या स्वप्नशिल्प सोसायटीला ते पटलेलं नाही. न विचारता हे काम करणं त्यांना आवडलेलं नाही. बाकी जनजागृती, चित्रकाराची प्रतिभा वगैरे नंतरचा विषय आहे. असेच या सोसायटीचे अप्रत्यक्ष म्हणणे आहे.
घोषवाक्य बघताच…
भिंतीवर लिहीलेली घोषवाक्य बघताच सोसायटीचा संताप झाला. परवानगी न घेता पुणे महानगरपालिकेने रंगरंगोटी केल्याचा त्यांना राग आला. पण इतर कुणासोबत असा प्रकार होऊ नये म्हणून सोसायटीने महापालिकेला नोटीस बजावली आहे.
१६ लाखांची भरपाई
परवानगी न घेता केलेल्या रंगरंगोटीपोटी पुणे महानगरपालिकेला नोटीस बजावताना १६ लाख रुपयांची भरपाई स्वप्नशिल्प सोसाटीने मागितली आहे. आमच्या भिंतीवर चित्र काढायची असेल तर आधी शुल्क भरा, असं सोसायटीनं म्हटलं आहे. त्यावर आयुक्तांनी फुकटात ४०० फुटांची भिंत रंगवून मिळाली असताना तक्रार कशाला करता? असा सवाल केला होता. पण परवानगीशिवाय हे काम केले असल्यामुळे महापालिकेने आपली चूक कबुल केली.
Pune Municipal Commissioner Housing Society