मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठित केल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठित करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे.
आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोदकुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैदराबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेशकुमार (यूजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.
आयआयटी कानपुरचे संचालक डॉ. अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मीना चंदावरकर (यूजीसी प्रतिनिधी) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिगंबर शिर्के यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ १८ मे २०२२ रोजी संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
Pune Mumbai University Vice Chancellor Selection Committee Declared