पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईलशिवाय आज काल कोणाचे पानही हलत नाही. मोबाईल ही आजच्या काळातील अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण, अलीकडे लहान मुलांच्या हातातही सर्रास मोबाईल दिसतात. सतत गेम खेळणे किंवा इन्स्टा, स्नॅप चॅटवर काही न काही पोस्ट करणे, हा एकमेव उद्योग ते करत असतात. पण, या लहानग्यांच्या हातात मोबाईल देणे हे किती धोकादायक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? पुण्यात नुकताच एका मोबाईलचा स्फोट झाला आहे. आणि या स्फोटात एका १० वर्षांच्या मुलाच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. मोबाईलचा स्फोट कसा झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी, रायगड जिल्ह्यातही मोबाईलमुळं सहा वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. मोबाइल पाहत असताना अचानक मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. या दुर्घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्या तोंडाला दुखापत झाली होती.
नेमकं काय घडलं?
शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथे ही घटना घडली. साहील नाना म्हस्के असं स्फोटात जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. स्फोटात जखमी झालेल्या साहिलला पालकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात साहिलवर उपचार सुरू आहेत. त्याच्या डोळ्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मुलांकडून मोबाईलचा वाढता वापर
लहान मुलांकडून मोबाईलचा वापर वाढला आहे. कोरोनाकाळात ऑनलाईन शाळा सुरू होत्या. त्यामुळे मुलांना मोबाईलची सवय लागली. आता शाळा ऑफलाईन झाल्या असल्या तरी मुलांच्या हातून मोबाईल सुटलेला नाही. मोबाईल अतीवापरामुळे स्फोट होऊन अनेकांचा जीव गेल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.
पालकांनो लक्ष द्या
मुलांच्या हातात मोबाईल देतानाही पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांचा स्क्रीन टाइम ठरवून घ्या. ठराविक वेळेनंतर मुलांच्या हातात मोबाईल देण्याचे टाळा. मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्यांना नाही ऐकण्याची सवय लावा.
का होतो मोबाईलचा स्फोट?
मोबाईल चार्जिंग करण्यासाठी ओरिजनल चार्जर वापरा. डुप्लिकेट चार्जरमुळं स्फोट होण्याची शक्यता असते.
मोबाईल सूर्यप्रकाशात ठेवून चार्ज केल्याने गरम होतो व त्याचा बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.
मोबाईल फुल्ल चार्ज झाल्यानंतरही चार्जिंग सुरू ठेऊ नये. त्यामुळं फोन गरम होतो व त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते.
मोबाईल चार्जिंग करताना कॉलवर बोलतो. चार्जिंग करताना मोबाईलचे तापमान जास्त असते. त्यामुळे मोबाईल गरम होतो अन् स्फोट होण्याची शक्यता असते.
मुलांना गेम खेळाची सवय असते. पण मोबाईलवर गेम खेळताना तो जास्त तापतो. मोबाईलचे तापमान जास्त वाढत गेले तर त्याच्या बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका असतो. त्यामुळे गेम खेळताना सावध रहा.
Pune Mobile Blast Children Injured