पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार ८६३ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते मंगळवारी (दि.५) म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जयस्वाल यांनी सांगितले की नूतन एकात्मिक गृहनिर्माण लॉटरी व्यवस्थापन संगणकीय प्रणालीद्वारे पुणे मंडळ सदनिका विक्री करिता सोडतीची प्रक्रिया राबवली जात असून सोडत काढल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्काळ ऑनलाईन प्रथम सूचना पत्र, स्वीकृती पत्र व तात्पुरते देकार पत्र पाठवण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील म्हणाले, म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली शहरातील ५ हजार ८६३ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ सप्टेंबर असून घरांची सोडत १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत आहे त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्जाची छाननी देखील ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. नोंदणी केलेल्या अर्जदारांना २७ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती २८ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. २९ सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.
सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील अर्जदारांना ऑनलाईन दावे, हरकती १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
सोडतीत पुणे जिल्ह्यासाठी ५ हजार ४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यासाठी ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यासाठी ३२ सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २ हजार ५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २ हजार ४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.
Online application registration for 5 thousand 863 flats of MHADA has started
Pune Mhada PCMC Affordable Homes Flats Applications
Kolhapur Sangli Solapur