पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही महिन्यांपूर्वीच पुणे येथे मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळावा या उद्देषाने महामेट्रोतर्फे मेट्रोची एक बोगी वाढदिवस, गेटटुगेदर तसेच छोटेखानी कार्यक्रमांसाठी काही तासापुरते किरायाने देण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या या निर्णयाची पुणेकरांनी खिल्ली उडवित वाढदिवस कशाला हनीमूनकरीताही मेट्रो किरायाने द्या म्हणत विविध मीम्स व्हायरल केले आहेत.
आपल्या अफलातून कल्पनाशक्तीने जगाला धक्के देण्यात पुणेकर एक्स्पर्ट आहेत. पुणेकर कधी, कुठे, काय बोलतील याचा नेम नसतो. पुणेरी पाट्या हे त्यांच्या इरसाल विनोदबुद्धीचेच सुपीक लक्षण आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अशा या पुणेकरांनी आता मेट्रोलाही सोडलेले नाही. पुणे मेट्रोने आपल्या वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर आनंदाच्या क्षणासाठी मेट्रोचे पॅकेज दिले आहे. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, गेट-टुगेदर किंवा इतर सेलिब्रेशन आता नागरिकांना मेट्रोमध्ये सेलिब्रेट करता येणार आहेत.
शंभर जणांसाठी पाच हजार रुपये शुल्क घेतले जाणार आहे. शंभर ते दीडशे प्रवाशांसाठी ७ हजार ५०० ते दीडशे ते २०० जणांसाठी १० हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या जाहिरातीवरुन पुणेकर चिडले आहे. मेट्रो ही प्रवाशांसाठी आहे, तो नफा कमवण्याचा उद्योग नाही, असे म्हटले आहे. यासंदर्भात पुणे मेट्रोने केलेल्या पोस्टवर पुणेकरांनी खास पुणेरी शैलीत घेरले आहे. अनेकांनी उपरोधक टीका केली आहे.
आनंदाचा क्षणच कशासाठी तर हानीमून पॅकेजही सुरु करा, असे म्हणत चांगलेच फटकारले आहे. आमच्या येथे बर्थडे पार्टीसाठी ट्रेन भाड्याने मिळेल, तसेच पापड, कुरडया आणि धान्य वाळवण्यासाठी स्टेशनची गच्ची भाड्याने मिळेल. लग्नाचा मेट्रो थीम प्लान लवकरच उपलब्ध होणार, हनिमून पॅकेज लवकरच पुणेकरांच्या भेटीला येणार, दीपोत्सव, नवरात्री, दांडिया, ख्रिसमस वगैरसाठी ऑर्डर आताच बुक करा, अशा कॉमेंट केल्या आहेत.
Pune Metro Offer Punekar Mims Viral