नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात पुणे रोडवरील पौर्णिमा बस स्टॉप येथे आज पहाटे झालेल्या हत्येचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला आहे. त्यामुळेच ३ संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर, एक संशयित फरार आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे.
आज भल्या पहाटे एका व्यक्तीचा नाशिक-पुणे रोडवरील पुर्णिमा बस स्टॉप जवळ खून झाल्याची घटना उघडकीस आली. मृत व्यक्ती ही पुणे येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले होते. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव हरीश भास्कर असे आहे. त्यांच्या खिशात आधार कार्ड सापडल्याने त्यांची ओळख पटली. लुटमारीच्या प्रकरणातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांनी तातडीने पडताळणी केली. त्याआधारे तपास चक्र गतीमान केले. सीसीटीव्ही फुटेजद्वारे हे स्पष्ट झाले की, चार ते पाच जणांच्या टोळक्याने हरीश यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आल्याचा संशय होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, आचल मुदगल यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता.
या हत्येबाबत पोलिस आयुक्त म्हणाले की, आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हरीश भास्कर (४४, रा. फ्लॅट नंबर 10, सुयश सहकारी संस्था, पश्चिम रंग सोसायटी जवळ, युनिव्हर्सल हाऊस जवळ, वारजे जकात नाका, पुणे) यांचा मृतदेह पौर्णिमा बस स्टॉपसमोर आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ३ संशयितांना अटक केली आहे. तर एक जण अद्याप फरार आहे. हा खून किरकोळ बाचाबाची वरून झाला असल्याचे दिसून येते. संशयित आरोपी आणि मयत हरिश यांची कुठल्याही स्वरुपाची ओळख नव्हती. मात्र संशयित हे नशेत होते. त्यामुळे नशेतच त्यांनी हरीश यांची हत्या केल्याचे आयुक्तांनी सांगितले.