पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदणी चौकचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आले होते. भाजपच्या माजी आमादार मेधा कुलकर्णी यांनी थेट आपली नाराजीची पोस्ट ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्यानंतर भाजपा कोथरुडचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. मेधा कुलकर्णी यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
पुनीत जोशी यांनी फेबुकमध्ये पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, पुणेकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन देशाचे वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते १२ ऑगस्ट रोजी पार पडले. पण या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल माजी आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. साधे हँडबिलवर फोटो नाही हा त्यांचा आक्षेप होता. पण याच वेळी शहरात २४० हॉर्डिंग्सवर यांचे फोटो होते, वृत्तपत्रातील जाहिरातीत यांचे फोटो होते. साधारण नाराजी असेल तर ती अशी जाहीर व्यक्त करायची नसते, ही पक्षाने आम्हाला दिलेली शिकवण आहे. पक्ष आधी नंतर आपण हे आपल्या पक्षाचे विचार आहेत. ऐन कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी तुम्ही असे व्यक्त होणे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला पटले नाही म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतोय.
माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांना पुण्यातील कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांना अनेक संधींसाठी भाजपकडून डावलण्यात आले. पण, त्यांनी पहिल्यांदा अशी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता पुनीत जोशी यांनी पोस्ट टाकली आहे.
मेधा कुलकर्णी यांची ट्विटरवर होती ही पोस्ट
मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे…. माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही. पण आता दुःख मावत नाही मनात. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण, मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी?
स्वतः गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते. माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा प्रश्न विचारला आहे.
मध्यंतरी मोदी, अमित शाह पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घेऊन निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे, असेही मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Kothrud president's Facebook post on Medha Kulkarni's allegation Pune Kothrud BJP Politics Leaders Dispute