पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सांस्कृतिक शहर, शिक्षणाचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे येथे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र चालायचे, असे म्हटल्यास कुणालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र, ही बाब सत्य असून एटीएसच्या तपासातून ही बाब पुढे आली आहे. पुणे शहरातील कोंढवा या वर्दळीच्या भागात दहशतावाद्यांना प्रशिक्षण दिले जायचे. तिथे त्यांचे ट्रेनिंग सेंटर असल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वीच पुणे येथून दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाची पाळेमुळे संपूर्ण राज्यभर दिसून येत आहेत. अशात आता नवीन माहिती पुढे आली आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी पुण्याच्या कोंढव्या भागामध्ये राहायचे. त्याच ठिकाणी दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसच्या तपासातून हे उघड झाले असून बॉम्ब तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच दहशतवाद्यांनी वापरलेली गाडीदेखील एटीएसने जप्त केली आहे. दहशतवाद्यांकडे असलेली एक कारदेखील एटीएसला सापडली आहे. या गाडीत २ बंदुक आणि ५ जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. घरी कोणाच्या हाती लागू नये म्हणून या दोघांनी बंदुक आणि काडतुसे गाडीत लपवून ठेवली होती.
इसीस कनेक्शन उघड
पुण्यातील दहशतवादी प्रकरणात एटीएसला मोठे यश आले आहे. दहशतवाद्यांचे इसीस कनेक्शन उघड झाले आहे. कोंढव्यामध्ये दहशतवाद्यांसाठी बॉम्ब तयार करण्याचे वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते. एटीएसने घटनास्थळी पुरलेले बॉम्बचे साहित्य जप्त केले आहे. थर्मामीटर, पीपेट, लँब इक्यूपमेंट जप्त करण्यात आले आहे. या बरोबरच बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी पांढरी पावडर सुद्धा एटीएसने जप्त केली आहे. ज्याठिकाणी या दोन्ही दहशतवाद्यांनी बॉम्बची चाचणी आणि प्रशिक्षण घेतले होते त्या ठिकाणावरुन ही पावडर जप्त करण्यात आली आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुण्यात लोक शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी जातात. त्यामुळे याठिकाणी दहशतवादाची पाळंमुळं रोवण्याची संधी इसीसने साधली. विशेष म्हणजे ज्याला अटक करण्यात आली आहे तो डॉक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींचा इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS), Daish/Islamic State in Khorasan सारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्या इसीसच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता, असे स्पष्ट झाले आहे.
इसीस संघटनेच्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या या इसमाचे नाव अदनाली सरकार आहे आणि तो डॉक्टर आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून तो पुण्यात राहायचा आणि त्याच्यावर दहशतवादी संघटनेतील भरतीची जबाबदारी होती. आयसिसचे मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवणं ही याची मुख्य जबाबदारी होती. महाराष्ट्र हे मॉडेल पोहोचवण्यात डॉक्टर अदनाली याचा मोठा हात होता. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतून तीन आणि ठाण्यातून एका जणाला अटक केलेली आहे.
pune kondhwa terrorists ats investigation bomb
trained material case