पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात एकच गोष्टीची चर्चा चालू आहे ते म्हणजे टोमॅटोचे वाढलेले प्रचंड दर. दोन महिन्यांपूर्वी हेच पीक पाच ते दहा रुपये इतक्या कवडीमोल भावाने विकले जात होते. दरात लवकर सुधारणा होणार नाही, याचा अंदाज बांधून उत्पादकांनी पीक वाऱ्यावर सोडल्याने रोगराईने ते उद्ध्वस्त झाले. त्यातच त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपे तयार करण्याबरोबरच लागवडीचा कालावधी किमान तीन ते चार आठवडे लांबणीवर टाकल्याने उत्पादन घटले. विहीर, तलावांनी तळ गाठल्यानंतरही ज्यांच्याकडे सिंचनाच्या सोयी आहेत, अशा मंडळींनी मे महिन्यात केलेल्या लागवडीवर विषाणूंच्या फैलावासह कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले. बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने दरामध्ये प्रचंड वाढ झाली त्यामुळे टोमॅटोचे भाव जणू काही गगनाला भिडले, शंभर ते दीडशे रुपये दराने टोमॅटो विकल्या गेले, काही ठिकाणी तर हा दर दोनशे रुपये इतका होता. जुन्नरमध्ये शेतकऱ्याने टोमॅटोच्या विक्रीतून कोट्यावधी रुपये कमावले.
१२ एकरवर लागवड
गेल्या दोन आठवड्यांत टोमॅटोच्या दरांनी केलेली शेकडोंची उड्डाणे सामान्यांना घायकुतीला आणण्यासाठी पुरेशी ठरली आहेत! कधी गॅस, कधी कांदे, कधी डाळींमुळे हवालदील होणारा सामान्य ग्राहक सध्या टोमॅटोमुळे मेटाकुटीला आला आहे. एकीकडे ग्राहकांची ही अवस्था असताना दुसरीकडे महाराष्ट्रात एका शेतकऱ्याने टोमॅटोच्या विक्रीमुळे कोट्यवधींचा नफा कमावल्याचे बोलले जात आहे. यामुळे टोमॅटोच्या दरांमुळे सामान्यांना आर्थिक भार सोसावा लागत असला, तरी दुसरीकडे बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळत असल्याचीही भावना व्यक्त होत आहे. उशिरा लागवडीमुळे मागणी-पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने संपूर्ण देशभरातच ‘टोमॅटोची कांद्यासारखी स्थिती उद्भवली आहे. कांद्यानंतर हे एकमेव पीक आहे, ज्याच्या दराने चक्क केंद्र सरकारही जागे झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकच्या एका शेतकऱ्याला एका दिवसात ३८ लाखांचा नफा झाल्याचे बोलले जात. त्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या जुन्नर भागातील तुकाराम भागोजी गायकर या शेतकऱ्याने गेल्या महिन्याभरात फक्त टोमॅटोच्या विक्रीतून सुमारे दीड कोटींचा नफा कमावल्याचे दिसून आले आहे.
मिळाला एवढा भाव
या शेतकऱ्यानं त्याच्या १८ एकर जमिनीपैकी १२ एकरवर टोमॅटोची लागवड केली होती. गेल्या महिन्याभरात गायकर यांनी तब्बल १३ हजार टोमॅटो क्रेटची म्हणजेच २० किलो प्रतीक्रेटने विक्री केली. त्यातून त्यांना दीड कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळ गेल्या महिन्याभराचा हिशोब लावला असता गायकर यांनी नारायणगंजमधील बाजारसमितीमध्ये केलेल्या विक्रीतून त्यांना भरघोस नफा मिळाला. गेल्या महिन्यात गायकर यांनी १००० ते २४०० रुपये प्रतीक्रेट दराने टोमॅटोची विक्री केली. गायकर यांच्याप्रमाणेच जुन्नरमधील इतर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनीही अशाच प्रकारे उत्पन्न मिळविले आहे. जुन्नरच्या नारायणगंज बाजारपेठेत टोमॅटोच्या एका क्रेटसाठी सर्वाधिक किंमत २५०० रुपये इतकी आली आहे. त्यामुळे टोमॅटोचे उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सध्या चांगले दिवस आले आहेत. परंतु हा भाव काही कायम राहणार नाही पुन्हा एक दोन महिन्यांमध्ये टोमॅटोचे भाव कोसळतील आणि मातीमोल भावाने टोमॅटो विकले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.