पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही दिवसांपूर्वी भाव नाही म्हणून पायाखाली टोमॅटो तुडविण्यात आले होते. अनेकांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले. पण अचानक टोमॅटोचे भाव गगनाला भिडले. त्यामुळे काहींचे नुकसान झाले तर काही लोक मालामाल झाले. एका शेतकऱ्याला तर टोमॅटोने पावणेतीन कोटी रुपये कमावून दिले.
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील एक शेतकरी गेल्या आठ वर्षांपासून श्रम घेत आहे. २०२१ मध्ये टोमॅटोचे दर घसरल्यामुळे त्याला २० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. पण त्याने जिद्द सोडली नाही. यंदा त्याने बारा एकरमध्ये टोमॅटोचीच लागवड केली होती. लोक टोमॅटो फेकून देत असताना त्याने मात्र प्रतीक्षा केली आणि आज त्याच टोमॅटोने त्याला तब्बल २.८ कोटी रुपयांची कमाई करून दिली. ईश्वर गायकर असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ते बारा एकरात टोमॅटोची लागवड करतात.
कधीकधी फक्त मुद्दलच मिळाली तर कधी नुकसान सहन करावे लागले. पण यंदा ते करोडपती झाले. त्यांच्याकडे अद्याप चार हजार कॅरेट्स टोमॅटो शिल्लक आहेत, त्यामुळे एकूण कमाई साडेतीन कोटी रुपये होईल, अशी त्यांना आशा आहे. गायकर कुटुंब २००५ पासून शेती करत आहे. आधी वडिलांनी शेतात जिवाचे रान केले होते. आता ईश्वर स्वतः राबत आहेत. सहा वर्षांपूर्वी गायकर यांनी टोमॅटो लागवड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी एक एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली होती. २०२१ मध्ये त्यांना जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. पण गायकर कुटुंबाने जिद्द सोडली नाही. त्यांनी पुन्हा टोमॅटोचीच लागवड केली. यंदा त्यांना बंपर लॉटरी लागली.
साडेतीन कोटी होतील!
मी आतापर्यंत १७ हजार कॅरेट टोमॅटो विकले आहेत. प्रत्येक कॅरेटची किंमत ७७० ते २३११ रुपये एवढी मिळाली. शेतामध्ये अद्याप तीन ते चार हजार कॅरेट टोमॅटो असतील. यामुळे टोमॅटोमधून एकूण साडेतीन कोटी रुपयांपर्यंत कमाई होईल, असे गायकर म्हणाले.
कष्ट घ्यावे लागले
टोमॅटो हब म्हणून ओळख असलेल्या जुन्नरमधील गायकरांनी बारा एकरात टोमॅटोची लागवड केली. पण त्यापूर्वी उन्हाळी हंगामासाठी त्यांनी ३५ लाख रुपये खर्च केले आणि त्यानंतर कष्ट घेतले. त्यानंतरच त्यांना फायदा झाला.