पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील फर्ग्युसन मार्गावरील प्रसिद्ध हॉटेल वैशालीच्या मालकीहक्कावरून वाद रंगत आहे. मुख्य म्हणजे हॉटेलमालकाच्या मुलीने या प्रकरणी स्वत:च्या पतीविरुद्ध तक्रार करत पॉवर ऑफ अटर्नी स्वत:च्या नावावर केल्याचा आरोप लावला आहे. एकप्रकारे हॉटेल बळकावल्याच्या आरोपाने खवय्यांच्या पसंतीस उतरणाऱ्या या हॉटेलची चर्चा वेगळ्याच कारणासाठी सुरू आहे.
विश्वजीत विनायकराव जाधव यांच्या पत्नीने मालकीहक्कावरून पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती विश्वजीत याने फिर्यादीला २०१८ मध्ये घुले रोड येथील राहत्या घरी नेत दारू व ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतक्यावरच न थांबता आरोपीने पिस्टलचा धाक दाखवून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पुण्यात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८), अभिजित विनायकराव जाधव (वय ४०), विनायकराव जाधव (वय ६५), वैशाली विनायकराव जाधव (वय ६०) यांचा समावेश आहे.
असा आहे इतिहास
जगन्नाथ शेट्टी १९४९ मध्ये पुण्यात आले. त्यांनी १९५१ मध्ये पुणे शहरात रुपाली, वैशाली आणि आम्रपाली हे हॉटेल्स सुरू केलेत. पुणे शहरातील त्रिदल संस्थेने जगन्नाथ शेट्टी यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ देऊन गौरव केला. दक्षिण भारतीय पदार्थांच्या गुणवत्तेमुळे हे हॉटेलचे अल्पवधीतच लोकप्रिय झाले. शरद पवार, राज ठाकरे आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या हॉटेलमधील पदार्थांचा स्वाद घेतला आहे.