पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविणारा डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर याच्या पाकिस्तानी एजंटसोबत परदेशात प्रत्यक्ष भेटी झाल्याची माहिती पुढे आली आहे. या परदेशी भेटींचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणा करीत आहे.
पाच वर्षांपूर्वी नागपूर डीआरडीओमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाला देखील पाकिस्तानी एजंटने हनी ट्रॅपमध्ये अडकवून माहिती काढून घेतली होती. या तरुणाने स्वतःच्या मोबाईल व लॅपटॉपचा वापर करून ही माहिती एजंट्सला पुरवली होती. कुरुलकर यांच्या बाबतीत याच गोष्टींचा शोध घेतला जात आहे. या एजंट्ससोबत संपर्क ठेवण्यासाठी कुरुलकर यांनी वापरलेल्या उपकरणांचा व माध्यमांचा तपास यंत्रणा शोध घेत आहे. खरे तर कुरुलकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत आणि डीआरडीओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर आहेत. या पदावरील लोकांना स्मार्टफोनचा वापर करण्याची परवानगी नाही. पण तरीही कुरुलकर स्मार्ट फोन वापरत होते. हे कसे शक्य झाले, याचा शोध घेतला जात आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने तरुणींच्या माध्यमातून वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मोहजालात अडकविल्याच्या घटना आहेत. नागपूरच्या घटनेचा वारंवार दाखला दिला जातो. त्यामुळे येथे कार्यरत व्यक्तींना स्मार्टफोनसारखी उपकरणे वापरण्यास तर मनाई आहेच. शिवाय समाजमाध्यमे वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे. कुरुलकर यांच्याकडून लॅपटॉप, चार्जर, मोबाईल आदी उपकरणे जप्त करण्यात आली आहे. कुरुलकर देशाच्या अन्य राज्यातील काही लोकांच्याही संपर्कात होते. त्यादृष्टीनेही तपास सुरू झाला असल्याची माहिती एटीएसने न्यायालयाला दिली.
कुरुलकर यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ च्या कलमानुसार दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नवी दिल्लीतील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने तक्रार दिली होती. न्यायालयाने कुरुलकर यांना ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीआयओला दिली माहिती
कुरुलकर यांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून ‘पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह’ (पीआयओ) गुप्तचर यंत्रणेला माहिती दिल्याचे तपासात आढळले आहे. त्यांनी शासकीय गोपनीय माहिती आर्थिक लाभासाठी पाकिस्तानला दिल्याचाही संशय आहे. ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांशी संपर्क साधताना कोणत्या उपकरणांचा वा माध्यमांचा वापर करत होते, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.
Pune Honey Trap DRDO Scientist ATS Investigation