पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यात एच३एन२ चे रुग्ण सातत्याने वाढताना दिसत आहेत. राज्य सरकारने अलीकडेच आरोग्य विभाग अलर्टवर असल्याचे सांगितले असून सर्व उपाययोजनांसाठी तत्पर असल्याचे म्हटले आहे. पण गेल्या तीन महिन्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १६७ रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत वातावरणात बदल होत आहे. मध्येच उकाडा, मध्येच पाऊस यामुळे पुणेकरांना सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे. यात लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वेगवेगळी लक्षणं जाणवत आहे. त्यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासोबतच मास्क वापरण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवडने रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाच सरकारी रुग्णालयात खाटा राखीव ठेवल्या आहेत. या प्रत्येक रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये पालिकेने दहा खाटा राखीव ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेने रुग्णांच्या उपचारासाठी शहरात 250 खाटा राखून ठेवल्या आहेत.
महापालिका अलर्टवर
पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 73 वर्षीय व्यक्तीचा एच३एन२ मुळे मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सतर्क झाले आहेत. रुग्णाचा बळी गेल्याने महापालिका हाय अलर्टवर दिसत आहे.
फेब्रुवारीत सर्वाधिक रुग्ण
जानेवारीमध्ये 27, फेब्रुवारीमध्ये 89 आणि मार्चमध्ये 46 रुग्ण आढळून आले. सध्या शहरात 13 सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी सहा रुग्ण सौम्य लक्षणांसह होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि सात रुग्णांवर चार वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इथे होतोय उपचार…
पुण्यातील नवीन थेरगाव हॉस्पिटल, नवीन भोसरी हॉस्पिटल, न्यू जिजामाता हॉस्पिटल, प्रभाकर कुटे मेमोरियल हॉस्पिटल, आकुर्डी आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय इथे एच३एन२च्या रुग्णांवर उपचार होत आहे.
ही काळजी घ्या
रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, पाच दिवस आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्या प्रकारे काळजी घेतली, त्या प्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे.
राज्यात #इन्फ्लुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणांना दिल्या आहेत. राज्यस्तरावरून त्याचे नियमित सनियंत्रण करण्यात येत आहे. लक्षणे दिसल्यास नागरिकांनी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत- आरोग्यमंत्री @TanajiSawant4MH यांचे विधानसभेत आवाहन#H3N2 pic.twitter.com/sg1FYpI1aI
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 15, 2023
Pune Health h3n2 162 Patients Infection Alert