पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे एका युवतीवर कोयत्याने हल्ला करण्यामागील कारण पोलिसांनी शोधून काढले आहे. फ्रेंडशिप कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला केल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे. या प्रकाराने समाजमन्न अक्षरश: सुन्न झाले आहे.
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात मंगळवारी एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पीडितेच्याच एका पूर्व मित्राने कोयत्याने हा हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांमुळे पीडित मुलीचा जीव वाचला आहे. पीडितेवर प्राथमिक उपचार करून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पोलिसांनी हल्लेखोराला अटक करून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२) असे आरोपीचे नाव असून तो मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी आहे.
या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपास केला असून संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. पुण्याचे झोन-१ चे डीसीपी संदीप सिंग गिल यांनी सांगितलं की, “काल (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठ परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. एका तरुणाने त्याच्या पूर्वीच्या मैत्रिणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी तरुण दोघंही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती, पण कालांतराने त्यांच्यात काही मतभेद झाले.”
बोलण्यास नकार, कायम करायचा पाठलाग
दोघांमधील मैत्री पुढेही कायम ठेवण्याची मागणी आरोपीने पीडित मुलीकडे केली. पण, मुलीने आरोपीच्या मागणीला नकार दिला. यामुळे आरोपीला पीडितेचा राग आला. दरम्यानच्या काळात पीडित मुलगी पुण्याला राहायला आली आणि ती ‘इंटेरिअर डिझाइन’चा कोर्स करू लागली. त्यानंतर आरोपीही पुण्यात आला आणि त्याने तिचा पाठलाग करू लागला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण पीडितेने आरोपीशी बोलण्यास नकार दिला. याच रागातून आरोपीने तिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला, अशी माहिती डीसीपी गिल यांनी दिली.