पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई, ठाणे, पुणे शहरासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. विवाहित महिलांवरील सातत्याने अत्याचार होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यात एका नराधम पतीने ५ मित्रांसह आपल्याच पत्नीवर सामूहिक बलात्कार केला आहे. पुण्यातील मार्केट यार्डजवळील परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या ५ मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे
मोबाईलवर चित्रीकरण
पुणे येथील एका महिलेचा सन २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एका इसमासोबत विवाह झाला होता. काही दिवसानंतर लग्नानंतर पतीने तिचा छळ सुरू केला. दररोजच्या भांडणाला कंटाळून पीडित महिला आपल्या माहेरी पुणे येथे आली. त्यानंतर सन २०२० मध्ये सदर महिलेचा पती आपल्या ५ मित्रांसह पुणे येथे तिला भेटण्यासाठी आला. परंतु तिच्या माहेरी न जाता पतीने तिला फोन करून घराबाहेर येण्यास सांगितले. पीडिता घराबाहेर येताच आरोपी पतीने तिला निर्जनस्थळी घराजवळील झुडपामध्ये खेचत नेले, त्याठिकाणी आरोपीचे ५ मित्र हजरच होते. यावेळी पतीसह ५ नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अत्याचाराचे मोबाईलवर चित्रिकरण सुद्धा केले.
वर्षभर सामूहिक बलात्कार
ती महिला आरडाओरडा करत असताना या पाच जणांनी तिचे तोंड दाबून आणि हातपाय बांधून हे अमानुष कृत्य केले. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. दरम्यान, या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. आरोपींनी याच गोष्टीचा फायदा घेत सुमारे वर्षभर वारंवार बोलावून तिच्यावर गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, वेदना असह्य झाल्याने पीडितेने या संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना दिली. आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे कळताच वडिलांनी पीडितेला घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. जाणारा नराधमाना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे.