पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान आरोग्य सुविधांच्या बाबतीत देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये पुणे सर्वोत्तम आणि दिल्ली सर्वात वाईट शहर ठरले आहे. येथील रुग्णालयांमधील बेड, हवेची गुणवत्ता, स्वच्छतेबाबत हौसिंग डॉट कॉमने जमा केलेल्या आकडेवारीतून ही बाब उघड झाली आहे.
हौसिंग डॉट कॉम हे एक पोर्टल असून यूएस-आधारित न्यूज कॉर्प आणि ऑस्ट्रेलियन गट आरईए ऑपरेट करते.
स्टेट ऑफ हेल्थ केअर इन इंडिया’ नावाने अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात देशातील आठ प्रमुख शहरांचा समावेश करण्यात आला आहे. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि पुणे यांचा या यादीत समावेश आहे.
या रँकिंगमध्ये प्रत्येक हजार लोकांना रुग्णालयाच्या बेडची उपलब्धता, हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता, राहणीमान यांचा समावेश असतो. यापैकी रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेवर जास्त भर दिला जात आहे. हौसिंग डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार आरोग्य सुविधांच्या बाबतीत पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर आहे. येथे दर एक हजार लोकांसाठी ३ किंवा ४ बेडची उपलब्ध आहेत. राष्ट्रीय सरासरीपेक्षा ही संख्या बरीच जास्त आहे. भारतात प्रति हजार लोकांवर सुमारे १ डॉक्टर आहे. तर इतर मोठ्या देशांमध्ये ही संख्या २ ते ४ डॉक्टर इतकी आहे.
हौसिंग डॉट कॉमच्या सीईओ मणि रंगराजन यांच्या मते, भारत हे आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असून आरोग्य सुविधांमध्ये जलद सुधारणा आवश्यक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे त्याचे उदाहरण आहे. या यादीत अहमदाबाद दुसर्या क्रमांकावर असून येथे देखील, एक हजार लोकांसाठी बेडची उपलब्धता तीन पेक्षा जास्त आहे.
दिल्ली मधील गुरुग्राम, फरीदाबाद आणि नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद या शहरांमध्ये या यादीत शेवटचा क्रमांक लागतो, कारण इतर शहरांच्या तुलनेत हवा, पाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छता देखील कमी आहे. तथापि, गुरुग्राम, नोएडा आणि फरीदाबादच्या तुलनेत गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडा मधील रुग्णालयांची घनता कमी आहे.