पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाझ दरम्यान पुणे मेट्रोनं प्रवास करुन प्रवासी नागरिकांशी संवाद साधला… या दौऱ्यात पवारांनी आढावा बैठक घेत मेट्रोच्या कामांचा आढावा घेतला.
यानंतर वाहतूक कोंडी बाबात विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश दिले.
या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह,महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, टाटा प्रोजेक्ट्स कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याच्यादृष्टीने प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा, खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका तसेच पोलीस वाहतूकांनी समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करावे. गणेश खिंड रॅम्पसाठी आवश्यक ४५ मीटर रुंदीचा रस्त्याच्या जागेचा ताबा (आरओडब्ल्यू) सर्व कार्यवाही करून १५ सप्टेंबरपर्यंत देण्यात यावा. यासाठी पुणे महानगरपालिकेने आवश्यक कार्यवाही करावी. औंध, बाणेर, पाषाण, गणेश खिंड रॅम्प येथील बॅरिकेडिंग करणे, आवश्यक तेथे वाहतूक वळविणे आदी कामे नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.
प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा ताब्यात घेण्याच्यादृष्टीने उशीर लागता कामा नये, असे निर्देश देतानाच उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित जागांशी निगडित प्रमुख अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन थेट संपर्क साधत सूचना केल्या. तसेच खासगी जागांबाबतही जागामालकांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. भविष्यातील ५० वर्षांचा विचार करुन प्रकल्पाच्या आराखड्यात तडजोड होता कामा नये, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी या प्रकल्पांतर्गत सुरू असलेले पाईलिंग, कास्टिंग आदी कामाचा तसेच समस्यांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला.
Deputy Chief Minister Ajit Pawar's journey by Metro Pune DYCM Ajit Pawar Metro Journey Review Meet Politics NCP