पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) शास्त्रज्ञाला येथे अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानी एजंटसोबत माहिती पुरवल्याचा आरोप आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सांगितले की, डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्रदीप कुरुलकर असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. तो डीआरडीओचा संचालक आहे. विशेष म्हणजे, आगामी सहा महिन्यात तो सेवानिवृत्त होणार होता.
हा शास्त्रज्ञ पुण्यातील डीआरडीओ शाखेत कार्यरत होता. तपासात व्हॉट्सअॅप संदेश, व्हॉईस कॉल, व्हिडिओ आणि सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या कार्यकर्त्यांशी त्याचा संपर्क उघड झाला. एटीएसने सांगितले की, जबाबदार पदावर असतानाही डीआरडीओच्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर केला. संवेदनशील सरकारी माहिती लीक करून त्याने आपली जबाबदारी आणि देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली. अशी माहिती शत्रू राष्ट्राच्या हाती पडल्यास भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे एटीएस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हनीट्रॅपशी संबंधित प्रकरण
हे हनीट्रॅपचे प्रकरण असल्याचे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले. या शास्त्रज्ञाला बुधवारी अटक करण्यात आली. मुंबईतील एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये अधिकृत गुप्तता कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
महिलेशी चॅटिंग
पाकिस्तानी महिलेशी या शास्त्रज्ञाने व्हॉटसअॅपवर चॅटिंग केल्याचे सांगितले जात आहे. एटीएसने या शास्त्रज्ञाचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलसह बाकी अन्य बाबींची कसून तपास सुरू आहे.
Pune DRDO Scientist Arrested by Maharashtra ATS Honey Trap Case