पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुटुंब व्यवस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. कुटुंबातील नाते जिव्हाळ्याचे असतात, परंतु अलीकडच्या काळात कुटुंबांमधील नातेसंबंधही बिघड झालेले आहे असे म्हटले जाते. त्यामुळे काही ठिकाणी एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार देखील घडत आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती व दौंड तालुक्यात दरम्यान,अशीच एक भयानक घटना घडली असून खुद्द जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलाच्या खूनाची सुपारी दिली होती, हा प्रकार उघड झाल्याने आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलाच्या आई वडील आणि अन्य तिघेजण यांना अटक करण्यात आली आहे.
मुलाच्या जाचाला कंटाळले अन्
एका अनोळखी युवकाचा खून करुन त्याचा मृतदेह दोरी आणि तारेने दगड बांधून बारामती तालुक्यातील शिरसुफळ येथील एका तलावात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. बारामती पोलीस आरोपींचा शोध घेत होते. मात्र आरोपी सापडत नव्हता त्याच दरम्यान दौंड तालुक्यातील एका गावात तरुण बेपत्ता झाल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. कारण दौंड तालुक्यातील रावणगाव येथे बाराते कुटुंब राहते, मजुरी करणारे वयस्कर पती-पत्नी व त्यांचा तरुण मुलगा हे एकत्र राहतात, मात्र तरुण मुलगा दारू पिऊन मारहाण करीत असल्याने वृद्ध दांपत्य आपल्या मुलाच्या त्रासामुळे कंटाळले तथा वैतागले होते. दरम्यान, पोपट बाराते, त्यांची पत्नी मुक्ताबाई बाराते आणि मुलगा सौरभ बाराते हे गावातून गेल्या तीन महीन्यापूर्वी अचानक गायब झाले होते. त्यानंतर १५ दिवसांनी केवळ बाराते दांपत्यच गावातील घरी परत आले होते. मुलगा सौरभ हा त्यांच्या सोबत आला नसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी पोपट बाराते आणि आणि पत्नी मुक्ताबाई याच्याकडे मुलगा सौरभच्या बाबत विचारणा केली. पोपट बाराते यांनी यावर उडवाउडवीची उत्तरे दिली.
यामुळे फुटली खुनाला वाचा
या खून प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. मात्र मयत तरुणाचे वडील उडवा- उडवीची उत्तरे देत होते, अखेर त्यांनी मयताच्या आईचा जबाब घेण्याचे ठरविले. आणि या खूनाला वाचा फुटली, मयतची आई मुक्तबाई यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी यावर अधिकची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, मुलगा सौरभ मला दारु पिऊन येऊन मारहाण करायचा. मला आणि माझे पती पोपट यांना त्रास देत होता. त्यामुळे मुलगा सौरभला ठार मारण्यासाठी गावातील बबलू पवार याला १ लाख ७५ हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्याने सौरभला ठार मारले. मुक्ताबाईंच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी बबलू पवार याची आणि त्याच्या मित्रांची चौकशी केली. बबलूने त्याचे मित्र बाबासाहेब गाढवे, अक्षय पाडळे यांच्या मदतीने सौरभला ठार मारल्याची कबुली दिली. तसेच त्याचा मृतदेह तलावमध्ये दगड बांधून टाकून दिल्याचे देखील सांगितले त्यानंतर याप्रकरणी या मजूर दांपत्यसह सुपारी घेऊन खून करणाऱ्या तीन जणांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
Pune District Daund Crime Mother Father Son Murder Police Contract Supari