मुंबई/पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरकारभार प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. या अटकेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रातील गैरकारभाराबाबत प्रथमच एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला अटक झाली आहे.
सध्याच्या कोरोना काळात अगदी बालवाडीपासून ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षणाचा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर, काही प्रमाणात ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी प्रत्यक्ष शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणे हा योग्य पर्याय असल्याचे पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्यातच सर्व परीक्षांबाबत ही असा संभ्रम आणि गोंधळ निर्माण होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात असे वातावरण असतानाच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये देखील गैरप्रकार आणि घोटाळे उघड होतांना दिसतात. अगदी आयआयटी परीक्षेपासून ते पीएचडी सेट-नेट यासारख्या परीक्षांमध्ये गैरप्रकार घडल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1471702277312303104?s=20
टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत सुपे यांनी अपात्र झालेल्या उमेदवारांना देखील पैसे घेऊन पास केले असल्याचे उघड झाले आहे. परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याने केले आहे. त्याच्या पिंपरी-चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रे सापडली होती. त्यामुळे टीईटीच्या परीक्षेत घोटाळा झाला असल्याचा पोलिसांचा संशय बळावला होता.
गुरुवारी सकाळपासून तुकाराम सुपेंना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर आज शुक्रवारी पुणे पोलिसांनी सुपे यांना अटक केली आहे. सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे.
जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील सुमारे २० जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी देण्यात आली होती. आता या सगळ्याच भरती प्रक्रियांबद्दल संशय निर्माण झाला आहे. कारण पेपर फुटीचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांना एका मागोमाग एक प्रकरणाचा तपास करावा लागत आहे. तसेच आणखी एका परीक्षेचा पेपर फुटल्याचे चौकशीत आढळत आहे. पेपर फुटीचे हे वाढते गैरप्रकार प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आणणारे आहे.
विशेष म्हणजे ज्या कथित जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे या परीक्षांसाठी उमेदवारांना हॉल तिकीट देणे, पेपरची छपाई करणे, परीक्षा घेणे, पेपर जमा करणे, स्कॅनिंग करून त्याद्वारे गुण देऊन निकाल जाहीर करणे अशी सर्व प्रकारची जबाबदारी होती. पण ही आता अशा प्रकारे या खासगी कंपनीच गोपनियतेचा भंग करत असल्याचे उघड झाल्याने खासगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचे कंत्राट देणे किती धोकादायक आणि संशयास्पद ठरणारे आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही उच्च स्पर्धा परीक्षा घेताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक ठरणार असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, आणखी या प्रकरणात कोणाला अटक होते, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.









