पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ईमेल आयडीतील स्पेलिंग चुकल्याने लाखोंचे नुकसान होऊ शकते, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, असे झाले आहे. स्पेलिंग चुकल्याने भलत्याचा अकाउंटवर पैसे वळते झाल्याने २२ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. या घटनेने नेटिझन्समध्ये प्रचंड खळबळ आहे.
पुण्यातील एका अभियांत्रिकी पुरवठा फर्मने फ्रान्सस्थित फर्मला ऑर्डर दिली होती. त्या बदल्यात कंपनीने २४ हजार युरो वळते केले होते. मात्र, अनेक दिवस झाले तरी ऑर्डर डिलिव्हर होईना यामुळे चिंतेत असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे. फसवणूक करणाऱ्याने यासाठी ई-मेल आयडीचे फक्त एक अक्षर बदलले होते. ही बाब फर्मचे उच्च अधिकाऱ्यांच्या देखील लक्षात आली नाही. जानेवारी, फेब्रुवारीतील हा प्रकार आता उघड झाला आहे.
फ्रान्सस्थित कंपनीने प्रो-फॉर्मा इनव्हॉइस पाठवून ऑर्डरची पुष्टी केली. त्यानंतर थोड्याच वेळात फर्मला एक ईमेल प्राप्त झाला. त्यात ते फ्रान्समधील नियमित बँक खाते आणि स्विफ्ट कोडमध्ये ट्रान्झेक्शन करू शकत नाहीत असे म्हटले होते. त्याऐवजी त्याने नवीन बँक खात्याचे तपशील दिले आणि त्यात पैसे भरण्यास सांगितले. आता कंपनीला ऑर्डर दिल्याचे फक्त त्या कंपनीला माहिती होते. त्यामुळे अधिकाऱ्यांचा विश्वास बसला. यामध्ये ईमेल आयडीतील स्पेलिंगमध्ये फक्त एका अक्षराचा फरक होता. यामुळे कंपनीच्याची लक्षात आले नाही व पैसे पाठविले गेले. यामध्ये ए च्या जागी ई करण्यात आले होते. या प्रकरणात फसवणूक करणाऱ्यांनी मध्यस्थांची ट्रिक वापरली आहे. हॅकर्सने फर्मचे ईमेल तपशील चोरले आणि त्याच्या आधारे संपूर्ण सापळा रचला होता. पोलीस याचा तपास करत आहेत.
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
गेल्या काही वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध प्रकारचे सायबर गुन्हे घडताहेत. कल्पनेपलीकडील या गुन्ह्य्रांचा तपास लावणे पोलिसांनादेखील आव्हानात्मक झाले आहे. अशात आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे सायबर गुन्ह्यांचा धोका अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नेटिझन्सनी अशा गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.