पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे तिथे काय उणे असे म्हणण्यात येते. शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिकनगरी अशी ओळख असलेल्या या शहरात सध्या हत्या, हल्ले यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारी वाढली असून त्यामुळे सामान्यांच्या मनात दहशतीचे वातावरण आहे. दर्शना पवार हीच्या हत्येनंतर आता एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. हल्ला झालेल्या तरुणीवी इस्पितळात उपचार सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच दर्शना पवार नावाच्या युवतीच्या हत्येने संपूर्ण पुणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र हादरले. सनदी सेवेची तयारी करणाऱ्या या युवतीवर हल्ला एकतर्फी प्र्रेमातून झाल्याची माहिती पुढे आली होती. त्यापाठोपाठ आता एकतर्फी प्रेमप्रकरणातून अन्य दुसऱ्या युवतीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील वर्दीळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेत ही घटना घडली. ज्यावेळी तरुणानं त्याच्या मैत्रिणीवर कोयत्यानं हल्ला केला, त्यावेळी तिच्यासोबत त्यांचा आणखी एक मित्रही होता. तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला. त्यावेळी हल्ल्यात जखमी झालेली तरुणी जीव मुठीत घेऊन सदाशिव पेठेत पळत सुटली. तिचा मित्र कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता. ती उपस्थितांकडे मदतीसाठी याचनाही करत होती. पण तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.
काही वेळाने एक तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर प्रहार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणानं कोयता धरला आणि हल्लेखोर तरुणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. उपस्थितांनी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली आहे.
काहींची बघ्यांची भूमिका
तरुणीवर हल्ला झाला तेव्हा रस्त्यावरील अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा तरुण असलेल्या लेशपाल जवळगे याने मुलीला मदत केली. लेशपाल हा देखील पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करते. तो रोजचे काम आटपून अभ्यासिकेत निघाला होता. रस्त्यात त्याला पीडित तरुणी पळताना दिसली. त्यामुळे त्याने हा सर्व प्रकार पाहिला आणि तिचा जीव वाचवला.