पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गेल्या काही दिवसांपासून तरूणी व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्शना पवार हत्या प्रकरण आणि त्यानंतर सदाशिव पेठेत भर रस्त्यात प्रेमातून कोयत्याने केलेल्या हल्ल्याने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर महिलांवरील हल्ले आणि या सगळ्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्यापही अशा प्रकारचे घटना वाढतच आहेत. यातच पुन्हा एकदा हल्ला झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
तरुणीचे डोकेच फोडले
गेल्या काही दिवसांपासून प्रेमातून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे, त्यामुळे पुणे शहर सुरक्षित आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जात आहे. आता एका घटनेत तरुणी भेटत नसल्याच्या कारणाने संतापलेल्या तरुणाने तरुणीवर हल्ला करत तिचे डोके फोडल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीचे डोके फोडले असून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात ३७ वर्षीय महिला जखमी झाली आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील बर्निग घाट परिसरात घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. संकेत शहाजी म्हस्के (वय २६) असे या तरुणाचे नाव आहे.
म्हणून केला जबर हल्ला
विशेष म्हणजे आरोपी संकेत आणि ३७ वर्षीय महिला हे एकमेकांचे मित्र आहेत. दोघेही एकाच परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होऊन भांडणे सुरू होते. त्यामुळेच ही महिला संकेत सोबत बोलत नव्हती. याचा राग संकेतच्या मनात होता. त्यामुळे संकेतने हल्ला केला. तू मला भेटत का नाहीस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझी होऊ शकत नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत संकेतने शिवीगाळ केली. मात्र, तरुणीने ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही’, असे उत्तर दिले. त्यानंतर संकेतचा संताप अनावर झाला. त्याने थेट तिला मारहाण सुरू केली. यात त्याने तिच्या डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर महिला घाबरली आणि खाली पडली. तेवढ्यात संकेतने अजून एक फटका दिला आणि तिला धमकी दिली. यात महिला जखमी झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल करून आरोपी तरुण संकेतला अटक केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.