पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून तरुणी आणि महिलांच्या विनयभंग, बलात्कार यासारखे भयानक प्रकार शहरात वाढले आहेत. त्यातच अनेक मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ४४ वर्षीय इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. हा भामटा आजारी असल्याचे सांगून मुलींना लिफ्ट मागायचा आणि बळजबरीने गाडीवर मुलींचा विनयभंग करत होता. या प्रकरणी काही मुलींना पोलिसांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
असा करायचा बनाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप प्रकाश वाणी हा आरोपीचे रस्त्यावर बिनधास्तपणे मुलींवर बळजबरी करायचा, तसेच त्यांच्या स्कूटीवर बसून तो त्यांचा विनयभंग करायचा. याबाबत एका पीडितेने महिलांच्या मदतीसाठी दिलेल्या टोल-फ्री नंबरद्वारे तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी अनुप वाणीला शोधून त्याला अटक केली. पीडित महिला सेनापती बापट रोड येथील बालभारती इमारतीजवळ तिच्या मैत्रिणीसोबत असताना वाणी त्याच्या स्कूटीवर आला आणि त्यांच्यासमोर थांबला. त्याने त्यांना चक्कर येत असल्याचे सांगितले, तसेच जवळच्या रुग्णालयात सोडण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेने मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मध्येच आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्यास सुरुवात केली. पीडितेने लगेच गर्दीच्या ठिकाणी वाहन थांबवून मदतीसाठी आरडाओरड केली. तेव्हा आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
तरुणींनी सांगितला तो प्रकार
विशेष म्हणजे पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता आरोपी अविवाहित असल्याचे समोर आले असून नैराश्यात त्याने हे सर्व कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. एका पिडीत महिलेने सांगितले की, आरोपीच्या बोलण्यावर माझा विश्वास होता आणि मी त्याला वैद्यकीय मदतीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र,मी त्याच्या दुचाकीवर बसताच त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. मी वाहन थांबवले आणि त्याला रस्त्यात सोडले, असेही पिडितेने सांगितले आहे. तर दुसरी मुलगी शिवाजी नगरची रहिवासी असून ती वाणीला भेटली. ती कोथरूडजवळील एका बँकमध्ये काम करते. तिला एका अज्ञात व्यक्तीने मॉडर्न कॉलेजजवळ माझ्याकडे येऊन मदत मागितली. जेव्हा मी त्याला माझ्या वाहनावर बसण्यास सांगितले, तेव्हा त्याने नकार दिला आणि मला त्याऐवजी त्याची स्कूटी चालवण्याची विनंती केली. पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि ते ठिकाण सोडले. नाहीतर त्यांने माझाही विनयभंग केला असता. यासंदर्भात पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटल आहे की, गुन्हेगारांनो आता सगळी माहिती व्हॉटस्अॅपवर मिळत आहे. त्यामुळे सावध रहावे, तसेच त्यांच्या तक्रारी पाहून तातडीने कारवाई होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.