पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील एका महाविद्यालयातील प्राध्यापिकेचे आक्षेपार्ह व्हिडियो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडली.
पुण्यातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील एक प्राध्यापिका आणि तिचा पती गेल्या काही दिवसांपासून आरोपी विद्यार्थ्याकडून मिळत असलेल्या धमकीने त्रस्त होते. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थी मुळचा बिहारचा असून त्याचे वय २६ आहे, तर प्राध्यापिकेचे वय ३६ आहे. विशेष म्हणजे प्राध्यापक महिलेचे विवस्त्र व्हिडियो आणि आक्षेपार्ह फोटोज काढण्याचा प्रकार २०२० पासून सुरू असल्याची धक्कादायक बाबही तक्रारीत नोंदविण्यात आली आहे.
आरोपी तरुण सातत्याने महिलेला इन्स्टाग्रामवर मेसेज करायचा. एवढेच नाही तर तो महिलेला अश्लील संदेशही पाठवायचा. त्यातच त्याने एक दिवस महिलेला धमकी दिली. मी सांगेन तसे केले नाही तर व्हिडियो आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल करेन, असे तो सांगू लागला. बरेच दिवस महिलेने त्याच्या म्हणण्यानुसार केले. पण नंतर ती त्रासली. त्यातच त्याने महिलेच्या पतीला सगळे व्हिडियो आणि फोटोज पाठवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. ५ हजार अमेरिकन डॉलर दिले नाहीत, तर फोटो आणि व्हिडियो व्हायरल करेन, अशी धमकी त्याने दिली. अखेर प्राध्यापक महिला आणि तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
बिहारचा तरुण
मयांक सिंग असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा बिहारचा आहे. त्याच्याविरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयांक ज्या महाविद्यालयात विद्यार्थी आहे, त्याच महाविद्यालयात पीडित महिला प्राध्यापक आहे.